स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून माजी नगरसेवकाचा पुत्र ठार
By किशोर कुबल | Published: January 1, 2024 12:48 PM2024-01-01T12:48:45+5:302024-01-01T12:49:49+5:30
स्मार्ट सिटीच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
किशोर कुबल, पणजी : स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून रायबंदर येथील आयुष हळर्णकर (२१) हा युवक ठार झाला. रॉयल एनिफल्ड बुलेट मोटरसायकलने तो पहाटे घरी परतत असताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज पहाटे ३.३० च्या सुमारास मळा येथे ही दुर्घटना घडली. स्मार्ट सिटीच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आयुष हा माजी नगरसेवक रुपेश हळर्णकर यांचा पुत्र होय. खोदकाम केलेल्या ठिकाणी बॅरिकेडस घातले नव्हते तसेच तेथे विजेचे दिवे पेटत नसल्याने आयुष याला खड्ड्याचा अंदाज आला नसावा व तो बुलेटसह थेट खड्डयात कोसळला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ने शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. परंतु सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मळा येथील या भागात गेले दहा दिवस पथदीप पेटत नव्हते. ते दुरुस्त करण्याची तसदी कोणी घेतली नाही. तसेच खोदकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी बॅरिकेडसही घातले नाहीत. रेडियमच्या पट्ट्याही लावल्या नाहीत. अपघात घडल्यानंतर तेथे पत्र्यांचे आश्चादन लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
स्मार्ट सिटीचा दुसरा बळी
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे याआधी रायबंदर येथे मजुराचा बळी गेला होता. अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने गाडला जाऊन मजूर ठार झाला होता. त्यानंतर हा दुसरा बळी ठरला आहे. स्मार्ट सिटीच्या खड्ड्यांमुळे शहरात किमान अकरा ट्रक कलंडण्याच्या किंवा रुतण्याच्या घटना घडलेल्या आहेत. बुलेट मोटरसायकल ज्या पध्दतीने खड्डयात कोसळलेली दिसत आहे ती पाहता तेथे लावलेल्या लाकडी फळ्यांवर तो जबरदस्त आदळलेला असावा व ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज आहे.