गोव्याचे माजी मुख्यमंत्री कामत यांची अटक टळली, अंतरिम जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 04:05 PM2017-11-20T16:05:27+5:302017-11-20T16:06:13+5:30
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना सोमवारी येथील विशेष न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.
पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना सोमवारी येथील विशेष न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला व कामत यांची अटक टळली. पूर्ण गोव्याचे लक्ष सोमवारच्या न्यायालयीन सुनावणीकडे लागून राहिले होते. मुख्यमंत्रीपदी असताना खनिज खाणीना कंडोनेशन ऑफ डिलेचा लाभ दिल्याबद्दल पोलिसांच्या विशेष तपास पथकाने कामत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून चौकशी चालवली आहे.
पोलिसांनी त्यांना गेल्या आठवड्यात समन्स पाठवले आणि मंगळवारी 21 रोजी हजर होण्यास सांगितले. तथापि, कामत हे आपल्याला अटक होईल या भीतीपोटी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीन गेले होते. गेल्या शनिवारी त्यांचा अर्ज सुनावणीसाठी आला होता, त्यावेळी न्यायालयाने कामत यांना अंतरिम जामीन मंजूर न करता पुढील सुनावणी सोमवारी ठेवली होती. तथापि पोलिसानी शनिवारी कामत यांना अटक करण्याची व्युहरचना केली होती.
कामत यांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापा टाकून सर्वत्र शोध चालवला होता. अटक चुकविण्यासाठी कामत "बेपत्ता " झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली आणि कामत यांना अंतरिम जामीन दिला गेला. यामुळे कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. आता या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. कामत हे आज मंगळवारी पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत. कामत यांच्याविरोधात यापूर्वी ईडीनेही गुन्हा नोंदवून चौकशी काम सुरू केले आहे.
दरम्यान, कामत यांच्यावर सरकार राजकीय सूड उगवू पाहत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. खाणीना कन्डोनेशन ऑफ डिले देणे हा गुन्हा नव्हे. कामत यांनी न्यायिक अधिकारांच्या कक्षेत राहून निर्णय घेतला होता असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक म्हणाले.