गोव्याचे माजी उपसभापती सायमन डिसोझा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 08:20 PM2020-09-23T20:20:17+5:302020-09-23T20:21:33+5:30
निधनावेळी सायमन डिसोझा ८२ वर्षांचे होते, गुरुवारी (दि.२४) वास्कोच्या सेंट अँड्रू चर्चच्या दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
वास्को: गोवा विधानसभेचे माजी उपसभापती तथा काँग्रेस नेते सायमन डिसोझा यांचे बुधवारी (२३) पहाटे गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार घेत असताना निधन झाले. निधनावेळी सायमन डिसोझा ८२ वर्षांचे होते, गुरुवारी (दि.२४) वास्कोच्या सेंट अँड्रू चर्चच्या दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी सायमन डिसोझा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायमन डिसोझा यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक संघटनेवरील पदे सांभाळून अनेक समाजहिताची कार्ये केलेली आहेत. १९७६ सालात ते मुरगाव, बोगदा भागातून मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर १९८४ सालात झालेल्या निवडणुकीत सायमन डिसोझा यांची काँग्रेस पक्षावरून दाबोळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवड झाली. १९८४ ते १९८९ या काळात त्यांनी दाबोळी मतदारसंघाचे आमदार या नात्याने विविध कामे केली. १९८९मध्ये पुन्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीत सायमन डिसोझा वास्को मतदारसंघातून काँग्रेस पक्षावरून निवडणुकीत उतरले असता त्यांचा दुस-यांदा आमदार म्हणून विजय झाला. यानंतर त्यांची गोवा विधानसभेत उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी काही काळ हे पद सांभाळत विविध कार्ये केली. सायमन डिसोझा यांनी काही काळ मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाचे (एमपीडीए) चेअरमनपदसुद्धा सांभाळलेले आहे. राजकीय नेता असण्याबरोबरच सायमन डिसोझा एक उत्तम पर्यावरणप्रेमीसुद्धा असून त्यांनी त्यांच्या काळात अनेक वर्षे वृक्षरोपण इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करून पर्यावरण हिताच्या दृष्टीने काम केले आहे. तसेच सर्वधर्मसमभावचा संदेश पसरवण्यासाठीसुद्धा सायमन डिसोझा विविध कार्यक्रम करताना मागच्या काळात दिसून आले आहेत. त्यांच्या पत्नी फेलिसिटी डिसोझा मुरगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत.
सायमन डिसोझा यांना चार मुली व एक मुलगा आहे. ते साकवाळ येथे त्यांच्या पत्नी व कुटुंबातील इतर सदस्याबरोबर राहायचे. गुरुवारी त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यविधी केल्यानंतर वास्कोतील सेंट अॅन्ड्रू चर्चच्या दफनभूमीत त्यांचे पार्थिव शरीर दफन करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. सायमन डिसोझा यांच्या निधनाबाबत वास्को तसेच गोव्यातील विविध ठिकाण्यावरील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त करून त्यांच्या काळात ते एक उत्तम राजकीय नेता असण्याबरोबरच एक उत्तम व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.