गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 06:16 PM2020-11-18T18:16:53+5:302020-11-18T18:19:51+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला शोक
पणजी : गोव्याच्या माजी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा (७७) यांचे काल बुधवारी दुःखद निधन झाले. ऑगस्ट २०१४ ऑक्टोबर २०१९ अशी तब्बल पाच वर्षे आणि दोन महिने मृदुलाजी गोव्याच्या राज्यपालपदी राहिल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. श्रीमती मृदुलाजी यांच्या निधनावर शहा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. भाजपसाठी तसेच साहित्य क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे शहा यांनी म्हटले आहे.
मातृतुल्य व्यक्तिमत्व हरपले; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी मृदुलाजी यांच्या निधनाने आपल्याला धक्काच बसल्याचे नमूद करून दुःख व्यक्त करताना त्या आपल्याला मातेसमान होत्या, असे म्हटले आहे. मृदुलाजी कला व साहित्याच्या भोक्त्या होत्या. तळागळात त्यांचे कार्य होते तसेच त्या उत्तुंग नेत्या होत्या. त्यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही मृदुलाजी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्या शांत व मृदूभाषी होत्या. त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात नेहमीच संबंध चांगले राहिले, असे कवळेकर म्हणतात.