गोव्याच्या माजी मंत्री विक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 05:41 PM2019-09-07T17:41:35+5:302019-09-07T17:43:58+5:30
गोव्याच्या माजी मंत्री आणि विधानसभेच्या माजी उपसभापती विक्टोरिया फर्नाडिस यांचे (वय 85 वर्षी) शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
पणजी: गोव्याच्या माजी मंत्री आणि विधानसभेच्या माजी उपसभापती विक्टोरिया फर्नाडिस यांचे (वय 85 वर्षी) शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. विक्टोरिया फर्नाडिस यांचे कालापुर बोंदीर येथे निवासस्थान असून त्यांच्या पार्थीवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
विक्टोरिया यांच्या निधनाने राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्वीस गोम्स आदींनी श्रीमती फर्नाडिस यांच्या निधनाविषयी एका लढाऊ बाण्याच्या महिला नेत्याला गोवा मुकला अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
1994 सालापासून 2007 सालार्पयत फर्नाडिस या सलग चारवेळा निवडून येऊन गोवा विधानसभेत पोहचल्या होत्या. तिसवाडीतील सांताक्रुझ मतदारसंघाचे त्यांनी 2012 र्पयत प्रतिनिधीत्व केले. 2012 साली त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही, त्यांचा पुत्र रुदॉल्फ उभा राहिला, तो पराभूत झाला. 2007 सालची निवडणूक श्रीमती फर्नाडिस यांची शेवटची निवडणूक ठरली. विक्टोरिया ह्या मुळच्या सासष्टीतील कुडतरी गावातील. राजधानी पणजीपासून जवळच असलेल्या कालापुर येथील रोमिओ फर्नाडिस यांच्या घरी रोमिओ यांच्या पत्नी बनून त्या आल्या.
सामाजिक कार्य करत फर्नाडिस पुढे आल्या होत्या व छोटय़ा कालावधीसाठी त्यांनी मंत्री पदही सांभाळले होते. तसेच पोर्तुगिज काळात जन्मलेल्या विक्टोरियांनी मुक्तीनंतर जनमत कौल, कोंकणी भाषा चळवळ, रापोणकार- मच्छीमार बांधवांची चळवळ, पीडीए आंदोलन अशा चळवळींमध्ये भाग घेतला. निर्भिड महिला नेत्या अशी छाप त्यांनी राजकारणातही उमटवली. उत्तर गोवा पीडीएचे चेअरमन पद देखील त्यांनी भूषविले होते. तसेच 1994 सालापासून सलग सतरा वर्षे त्यांनी गोवा विधानसभेच्या सदस्य म्हणून काम केले.