माजी नगराध्यक्षांना तीन महिने कैदेची शिक्षा; अल्पवयीन मुलांना शिवीगाळ, मारहाण करणं भोवलं
By वासुदेव.पागी | Published: November 16, 2023 08:07 PM2023-11-16T20:07:54+5:302023-11-16T20:08:13+5:30
१२ डिसेंबरपर्यंत ही शिक्षा निलंबित ठेवण्यात आली आहे.
पणजी : अल्पवयीन मुलांना शिविगाळ व मारहाण केल्या प्रकरणी पेडणेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू हे दोषी ठरले असून पणजी बाल न्यायालयाने त्यांना तीन महिने साधी कैद आणि १.१० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये ही घटना घडली होती. म्हापसा येथील साल्ढाणा इमारतीच्या छतावर तीन लहान मुले बसली असताना त्या इमारतीत राहणारे देशप्रभू हे तेथे आले आणि त्यांनी मुलांना तेथून जाण्यास सांगितले. ती मुले तेथून न गेल्यामुळे देशप्रभू यांनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार या तिघांपैकी एका मुलाच्या वडिलांनी म्हापसा पोलिसांत केली होती. मुलांना दंडुक्याने मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले होते. तिघांपैकी एका मुलाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला इस्पितळात दाखल करावे लागले होते. त्याच मुलाच्या वडिलांनी ही तक्रार नोंदविली होती.
पालकांच्या तक्रारीला अनुसरुन देशप्रभू यांच्याविरोधात तिघा अल्पवयीन मुलांना मारहाण केल्या प्रकरणी भादंसंच्या कलम ५०४, ५०६, ३२४ आणि गोवा बाल कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात देशप्रभू यांनी त्यावेळी अटकपूर्व जामीन मिळवून अटक चुकविली होती. परंतु म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केल्यामुळे खटला चालविण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांच्या बाजूने प्रभावी युक्तिवाद झाल्यामुळे आणि मुलाबाबत आझिलो इस्पितळातून दुखापतीचे प्रमाणपत्र सादर करण्यास पोलिसांना यश मिळाल्यामुळे खटल्याचा निकाल देशप्रभु यांच्या विरोधात लागला. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवताना ३ महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. तसेच १.१० लाख रुपये दंडही ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक महिना अतिरिक्त शिक्षा म्हणजे एकूण ४ महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा देशप्रभू यांना भोगावी लागणार आहे. तसेच दंड भरल्यास ५० टक्के रक्कम मुलाच्या नावे राष्ट्रीय बँकेत कायम ठेव म्हणून जमा करण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे. ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असली तरी त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तूर्त १२ डिसेंबरपर्यंत ही शिक्षा निलंबित ठेवण्यात आली आहे.