उपचार पूर्ण करुन माजी मंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोजा बुधवारी गोव्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 06:52 PM2018-10-30T18:52:19+5:302018-10-30T18:52:35+5:30
मागील दोन महिन्यापासून अमेरिकेत उपचार घेत असलेले माजी मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अॅड. फ्रान्सिस डिसोझा आपला उपचार पूर्ण करुन बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत.
म्हापसा - मागील दोन महिन्यापासून अमेरिकेत उपचार घेत असलेले माजी मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अॅड. फ्रान्सिस डिसोझा आपला उपचार पूर्ण करुन बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत.
मागील दोन महिन्याहून जास्त काळ ते अमेरिकेत उपचार घेत होते. २० आॅगस्ट रोजी राज्यातील मंत्रीपदी असताना ते उपचारासाठी अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले होते. आपल्याला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे व्यक्तव्य करुन त्यांनी त्यावर आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती.
बºयाच काळापासून आजारी असलेले डिसोझा हे जुलै महिन्यात पहिल्यांदा उपचारासाठी मुंबईत गेले होते. त्यावेळी त्यांचा तेथे काही चाचण्या घेण्यात आलेल्या. मुंबईतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर १ आॅगस्ट रोजी पुन्हा गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर पुन्हा मुंबईला जावून ९ आॅगस्टला पुन्हा गोव्यात आले होते. मुंबईतील डॉक्टरांनी उपचारा दरम्यान दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून अमेरिकेत जाण्यासाठी अधिकृत परवानगी घेवून पुढील उपचारासाठी २० आॅगस्टला रवाना झाले होते. त्यावेळी त्यांच्या समवेत डिसोझा यांची पत्नी तसेच मुलगा अमेरिकेत गेले होते. याच कालावधीत सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात ते आरोग्याच्या कारणास्तव सहभागी होवू शकले नव्हते.
त्यांच्यावर सुरु असलेले उपचार १० आॅक्टोबरला पूर्ण झाले होते. त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी त्यांच्या शरीराची स्कॅनद्वारे पूर्ण चाचणी घेण्यात आलेली. केलेल्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी अमेरिकेतून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. बुधवारी मुंबईवरुन ते गोव्यात परतण्याची संभावना आहे. अमेरिकेत जाताना मंत्री असलेले डिसोझा पुन्हा गोव्यात दाखल होताना मात्र फक्त आमदार या नात्याने येणार आहेत. नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ते अमेरिकेहून निघणार असून बुधवारी संध्याकाळी मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच दिवशी रात्री किंवा गुरुवारी सकाळी गोव्यात दाखल होण्याची संभावना आहे.