उत्तर गोव्याच्या तिकिटावर माजी मंत्री परुळेकरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 03:16 PM2023-05-10T15:16:30+5:302023-05-10T15:18:24+5:30
'लोकमत'ने परुळेकर यांच्याशी संपर्क साधला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजप श्रीपाद नाईक यांना जर उमेदवारी देणार नसेल तर पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून माझा तिकिटावर दावा असेल, असे माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
'लोकमत'ने परुळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर, माजी सभापती दिवंगत अनंत शेट, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर काम केलेले आहे. श्रीपादभाऊंना पक्ष तिकीट देत नसेल तर वरिष्ठ म्हणून मी दावा करीन.
मी नेहमीच पक्षासोबत निष्ठेने राहिलो. गेल्या विधानसभा निवडणुकीत मला पक्षाने तिकीट नाकारली तरीदेखिल गद्दारी न करता पक्षाकडे प्रामाणिक राहिलो. साळगावमधून निवडून येऊन मी मंत्रीपदही सांभाळले आहे. लोकांशी अजूनही मी कायम संपर्क ठेवून आहे. त्यामुळे मला तिकीट मिळायला हवी. पक्ष जर श्रीपादभाऊंना तिकीट देत असेल तर मात्र मी दावा करणार नाही. त्यांच्या विजयासाठी वावरेन, असेही परुळेकर यांनी सांगितले.