पर्रीकरांच्या बैठकीला जाण्यास माजी मंत्री डिसोझा अनुत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 01:11 PM2018-12-01T13:11:57+5:302018-12-01T13:14:31+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावलेले असले तरी, ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावले असले तरी, ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत.
डिसोझा याना अलिकडेच पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिलेला आहे. डिसोझा हे अमेरिकेतील रुग्णालयात उपचार घेत होते व त्यावेळीच त्याना मंत्रिमंडळातून डच्चू दिला गेला. भाजपाच्या श्रेष्ठींनी केलेल्या सूचनेनुसार आपण तुम्हाला मंत्रिमंडळातून वगळत असल्याचे पर्रीकर यांनी डिसोझा याना त्यावेळी सांगितले होते. स्वत: पर्रीकरही त्यावेळी रुग्णालयात होते. मात्र आपल्याला डच्चू देण्याचा निर्णय भाजपाच्या श्रेष्ठींचा नव्हे तर गोवा भाजपाच्या कोअर टीमचा व पर्रीकर यांचाच आहे अशी डिसोझा यांची भावना झाली. त्यावेळपासून ते खूप दुखावले व नंतर त्यांचा कधी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी संवाद झाला नाही.
पर्रीकर हे आजारी असून ते आपल्या खासगी निवासस्थानीच असतात. मात्र भाजपाचे काही आमदार व सरकारमधील काही बिगरभाजपा मंत्रीही अलिकडे प्रशासन ठप्प झाल्याची टीका जाहीरपणे करू लागल्यानंतर पर्रीकर यांनी आमदारांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सायंकाळी प्रथमच त्यांच्या निवासस्थानी भाजपा आमदार एकत्र येतील. पर्रीकर यांनी बैठकीचा अजेंडा आम्हाला सांगितलेला नाही पण आम्ही बैठकीला जाणार असे दोन आमदारांनी लोकमतला सांगितले. ज्येष्ठ आमदार डिसोझा यांनी मात्र आपण कदाचित बैठकीला जाऊ शकणार नाही असे सांगितले. आपल्यालाही बोलविले गेले आहे पण आपण रुग्णालयातून आल्यानंतर घरीच आहे. आपण अजून एकही दिवस घराबाहेर पडलेलो नाही. त्यामुळे पर्रीकर यांनी बोलविलेल्या बैठकीस जावे असे वाटत नाही. शेवटी त्या बैठकांमध्येही काही ठरत नसते, असे डिसोझा म्हणाले.
दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे गोव्याबाहेर आहेत. त्यामुळे तेही बैठकीला पोहचणार नाहीत. आपण पोहचू शकणार नसल्याची कल्पना त्यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना दिलेली आहे.