माजी मंत्री रमेश तवडकर याना कोर्ट उठेपर्यत बसून राहण्याची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 06:21 PM2020-10-28T18:21:12+5:302020-10-28T18:21:15+5:30
Goa Court: पुनो वेळीप मारहाण प्रकरण: शिक्षेला एक महिन्याची स्थगिती
मडगाव: सर्वांचे ज्या प्रकरणाकडे लक्ष लागून राहिले होते त्या पुनो वेळीप मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले भाजपाचे माजी मंत्री रमेश तवडकर याना शेवटी काणकोण न्यायालयाने कोर्ट उठेपर्यत न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा सुनावली.
न्या. शानुर अवदी यांनी तवडकर याना 10 हजार रुपयांचा दंडही फर्मावला. हा दंड भरल्यास ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार पुनो वेळीप याना देण्याचा आदेश दिला.तवडकर यांचे वकील ऍड. विजय गायकर यांनी शिक्षेच्या कार्यवाहिला स्थगिती मागितली असता कोर्टाने ती मान्य करताना या शिक्षेच्या विरोधात अपील करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मंजूर केली.
या निकालाला आपण सत्र न्यायालयात आव्हान देणार असल्याचे माजी मंत्री तवडकर यांनी सांगितले. राजकारणातून आपल्याला संपविण्यासाठी 2017 साली आपल्या विरोधात हे राजकीय कुभांड रचले होते अशी प्रतिक्रिया यापूर्वी तवडकर यांनी व्यक्त केली होती.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की 2017 साली तवडकर हे मंत्री असताना ते आपल्या शासकीय गाडीने खोतीगाव येथे जात असताना स्कुटरवरून जाणारे पुनो वेळीप याना त्यांनी व अन्य 5 माणसांनी बळजबरीने अडविले व त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला तसेच जिवंत मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिली होती. काणकोण न्यायालयाने तवडकर याना वेळीप याना बळजबरीने अडविण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले मात्र मारहाणीचा प्रयत्न करणे आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले होते. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अनिरुद्ध चिमूलकर यांनी बाजू पाहिली.