मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष नागवेकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:45 PM2020-04-30T13:45:32+5:302020-04-30T14:25:00+5:30
डॉ. नंदकुमार कामत यांनी नागवेकर यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले.
पणजी: मराठी भाषेचे जाज्वल्य अभिमानी, आयुष्यभर मराठीच्याबाजूने संघर्ष केलेले इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक व लेखक पांडुरंग नागवेकर यांचे गुरुवारी निधन झाले. वळवई येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी साडेसातच्या सुमारास नागवेकर यांची प्राणज्योत मालवी. ते अलिकडे आजारी होते.
नागवेकर हे व्यवसायाने वकील होते. गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्षस्थान भुषविण्याची संधी त्यांना मिळाली होती. मराठी ही गोव्याची राज्यभाषा झाली पाहिले म्हणून जी चळवळ झाली होती, त्यात नागवेकर हे इतरांप्रमाणोच हिरहिरीने सहभागी झाले होते. स्वर्गीय शशीकांत नाव्रेकर, प्रा. गोपाळराव मयेकर, स्वर्गीय शशिकला काकोडकर आदी अनेकांसोबत नागवेकर यांनी यापूर्वीच्या काळात मराठी भाषा चळवळीत काम केले.
मराठीच्याबाजूने लेखन करूनही त्यांनी अनेकदा मराठीसाठी योगदान दिले. वकील म्हणून व्यवसाय करतानाही ते कधी आक्रस्ताळेपणाने वागले नाहीत. शांतपणो आपले काम ते करत राहीले. ते व्यवसायात सक्रिय होते तेव्हा रोज वळवईहून ते पणजीला येत असत. वळवई येथील ललितप्रभा नाटय़मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये ते अग्रस्थानी असायचे. एकेवेळी त्यांनीच पुढाकार घेऊन पंचाहत्तर नाटय़कलाकारांचा वळवईत सत्कार घडवून आणला होता.
नागवेकर यांच्या मागे पत्नी शील्पमाला, एक पुत्र व दोन विवाहित कन्या असा परिवार आहे. मराठीच्या सच्च सेवकाला गोवा मुकला अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी गुरुवारी व्यक्त केली.
वळवई येथील ललितप्रभा नाटय़मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये ते अग्रस्थानी असायचे. एकेवेळी त्यांनीच पुढाकार घेऊन पंचाहत्तर नाटय़कलाकारांचा वळवईत सत्कार घडवून आणला होता. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून द्यावा म्हणून 1987 सालच्या आसपास झालेल्या उग्र आंदोलनावेळी नागवेकर यांना मनस्तापालाही सामोरे जावे लागले. नंतरच्या कालावधीत काकोडकर, मयेकर आदींनी मराठीसाठी जी गावागावांत ज्ञानेश्वर पालखी नेली होती, त्या कार्यक्रमातही नागवेकर सहभागी झाले होते. गोव्यात सर्वाधिक वाचक मराठीचे आहेत व येथील उपलब्ध शिलालेख हे मराठी भाषेची गोव्यातील महती सांगण्यास व स्थान पटवून देण्यास पुरेसे आहेत, असा युक्तीवाद नागकेर कायम करत असत.
डॉ. नंदकुमार कामत यांनी नागवेकर यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले. गोव्याच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात नागवेकर यांनी उत्कृष्ट योगदान दिले. गोव्यातील कोमुनिदाद, मंदिरे यावर नागवेकर यांनी लिहिलेली मोठी पुस्तके त्यांचे या संस्थांप्रतीचे प्रेम दाखवून देतात. गोवा आर्काइव्हजमधील कागदपत्रंचे महत्त्व समजणारे ते गोव्यातील अवघ्याच वकिलांपैकी एक होते. एक निष्ठावान संशोधक व मराठी भाषा, साहित्याचा पुरस्कर्ता आज हरपला. गोवा व महाराष्ट्र यांच्यात चांगले नाते असावे अशी भावना कायम जपलेला व त्याच भावनेतून मराठीचा अविचल पुरस्कार करणा:या नागवेकर यांना गोवा मुकला असे कामत म्हणाले.