भारतीय स्टेट बँकेचे माजी चेअरमन पी. जी. काकोडकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 20:48 IST2020-11-08T20:48:42+5:302020-11-08T20:48:59+5:30
पांडुरंग घन:श्याम काकोडकर हे भारतीय स्टेट बँकेत १९५७ साली प्रशिक्षणार्थी साहाय्यक म्हणून रुजू झाले आणि ३१ मार्च १९९७ रोजी बँकेचे चेअरमन म्हणून सेवानिवृत्त झाले.

भारतीय स्टेट बँकेचे माजी चेअरमन पी. जी. काकोडकर यांचे निधन
पणजी : भारतीय स्टेट बँकेचे माजी चेअरमन तथा गोवा लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष गोमंतकीय सुपुत्र पी. जी. काकोडकर (वय ८३) यांचे आज रविवारी निधन झाले. तब्बल ४0 वर्षे भारतीय स्टेट बँकेत त्यांनी सेवा बजावली. काकोडकर यानी त्यावर २00६ साली आत्मचरित्रही लिहिले.
पांडुरंग घन:श्याम काकोडकर हे भारतीय स्टेट बँकेत १९५७ साली प्रशिक्षणार्थी साहाय्यक म्हणून रुजू झाले आणि ३१ मार्च १९९७ रोजी बँकेचे चेअरमन म्हणून सेवानिवृत्त झाले. स्टेट बँकेला उच्च शिखरावर नेण्यास त्यांचा मोठा हातभार आहे. आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी बँकेच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे तसेच भारतीय अर्थव्यवस्थेबाबत लिहिले आहे. आणीबाणीच्या काळात बँकेवर आलेला दबाव, नगरवाला घटना, २0 कलमी कार्यक्रम हाताळताना बँकेसमोर उभी ठाकलेली आव्हाने, हर्षद मेहता घोटाळा आदी विषयांवरही त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना असे म्हटले आहे की, काकोडकर हे मोठमोठ्या हुद्यांवर असतानाही मातृभूमी गोव्याशी नेहमीच कनेक्टेड राहिले. गोव्याच्या बाबतीत चांगले निर्णय घेण्यासाठी ज्या मोजक्याच दिग्गजांचा सल्ला घेतला जातो त्यात काकोडकर यांचा समावेश होता. ते गुरुबाब म्हणून परिचित होते.