RSSचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:50 PM2018-11-18T13:50:41+5:302018-11-18T13:53:09+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात रितसर प्रवेश केला असून त्यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात रितसर प्रवेश केला असून त्यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यात विधानसभा विसर्जन अटळ असून लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित करताना वेलिंगकर यांनी 35 मतदारसंघांमध्ये पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करील, असे जाहीर केले. ही निवडणूक गोसुमंसाठी सेमिफायनल असेल असे नमूद करताना एकदा निवडणूक जाहीर होऊ दे, या सरकारचे सर्व कारनामे उघड करीन, असा इशाराही त्यांनी दिला. माध्यम प्रश्नावर गेली सात वर्षे लढा देणारे वेलिंगकर यांनी पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारशी असलेले संबंध तोडले व त्यानंतर संघाकडेही फारकत घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्थापन झालेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाचे ते मार्गदर्शक होते परंतु राजकारणात सक्रीय नव्हते. आज त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा अर्ज भरुन पक्षात प्रवेश केला.
वेलिंगकर यांनी पर्रीकर सरकावर आगपाखड करताना प्राथमिक शिक्षणाबाबत माध्यम प्रश्नावर पर्रीकर यांनी जो विश्वासघात केला त्याबाबत कडाडून टीका केली. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतूनच असावे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान रद्द करावे या मागणीवर पक्ष ठाम असल्याचे ते म्हणाले.
‘सरकारचे सर्व कारनामे उघड करीन’
वेलिंगकर पुढे म्हणाले की, ‘आजारी असूनही मुख्यमंत्रीपद स्वत:कडेच रहावे या पर्रीकर यांच्या हट्टापायी राज्याचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. लोकांची कोणतीही कामे होत नाहीत. खाणबंदीचा प्रश्न हे सरकार सोडवू शकलेले नाही, असे आरोप करताना वेलिंगकर पुढे म्हणाले की, गोव्यात भाजपच्या जडणघडणीत सुरवातीपासूनचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी संघाचे २५0 कार्यकर्ते निवडणुकीच्या कामासाठी भाजपला दिले याची खंत आता वाटते. या सरकारने जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. पर्रीकर यांनी एकाधिकारशाही चालवली असून राज्य रुग्णशय्येवरुन चालवले जात आहे. अन्य मंत्री, आमदार नपुंसक बनून या गोष्टी सहन करीत आहेत. एकदा निवडणूक जाहीर होऊ दे, या सरकारचे सर्व कारनामे उघड करीन.’
‘लोक कल्याणकारी सरकार हवे’
तत्त्वनिष्ठा आणि नैतिकता असलेले लोकहितकारी आणि लोक कल्याणकारी सरकार जनतेला देण्यासाठी राजकारणात यावे लागले. इतर राजकारण्यांप्रमाणे लोकांची मतें मिळविण्यासाठी देणग्या देणे किंवा त्यांना तीर्थयात्रांना पाठवणे या गोष्टी आम्हाला शक्य नाही. माझे कार्यकर्ते हीच माझी शिदोरी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाच मतदारसंघांमध्ये मिळविलेली १0,५00 मतें हा खरे तर गोसुमंचा विजयच आहे. लोक आमच्याबरोबर आहेत हे यातून सिध्द होते, असे वेलिंगकर म्हणाले.
गोसुमंचे अध्यक्ष आत्माराम गांवकर यांनी पुढील पाच वर्षात सरकार हे गोसुमंचेच असेल आणि वेलिंगकर मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास व्यक्त केला. व्यासपीठावर भारतीय भाषा सुरक्षा मंचचे उदय भेंब्रे, अरविंद भाटीकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, गोसुमंचे ज्येष्ठ उपाध्यक्ष किरण नायक, महिला अध्यक्षा रोशन सामंत, भारत माता की जय या संघटनेचे अवधूत कामत, अॅड. स्वाती केरकर, डॉ. प्रकाश कुराडे, युवा अध्यक्ष नीतीन फळदेसाई, नंदन सावंत, संदीप पाळणी, विनायक पाळणी आदी उपस्थित होते.