गोव्यात १३३० कोटींच्या प्रकल्पांची PM नरेंद्र मोदींकडून पायाभरणी व उद्घाटन!
By किशोर कुबल | Published: February 6, 2024 03:28 PM2024-02-06T15:28:12+5:302024-02-06T15:28:38+5:30
फातोर्डा, मडगाव येथे झालेल्या विराट जाहीर सभेत हजारो लोकांची उपस्थिती लाभली आहे.
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'विकसित भारत, विकसित गोवा २०४७' कार्यक्रमांतर्गत १३३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. मोदी यांनी रोजगार मेळ्यांतर्गत विविध विभागांमधील १९३० नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशही वितरित केले. फातोर्डा, मडगाव येथे झालेल्या विराट जाहीर सभेत हजारो लोकांची उपस्थिती लाभली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई व इतर मान्यवर व्यासपीठावर आहेत. कुंकळ्ळी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दोनापॉल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, बेती येथील आयएनएस मांडवी नेव्हल वॉर कॉलेजचे नवीन कॅम्पस आणि कुडचडे येथील एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधा या चार प्रकल्पांचे उद्घाटन तसेच रेइश मागुश येथी पीपीपी तत्वावर येऊ घातलेला 'रोप वे प्रकल्प', पाटो-पणजी येथील थ्री डी-प्रिंटेड इमारत आणि शेळपें, साळावली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी रिमोट कंट्रोल द्वारे बटन दाबून वर्चुअल पद्धतीने केली. सभेच्या स्थळी ७० हजार लोक उपस्थित असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.