दक्षिण गोव्यातील काकोडात १00 टनी कचरा प्रकल्पाची पायाभरणी- मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:59 PM2019-12-11T23:59:24+5:302019-12-11T23:59:51+5:30
स्वच्छ आणि हरित गोवा हेच ध्येय
पणजी : दक्षिण गोव्यात काकोडा येथील १00 टनांच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी येत्या शुक्रवारी १३ रोजी होत आहे. येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून चार तालुक्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या अनुषंगाने कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांच्याशी संवाद साधला असता गोवा स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी लोकांचेही सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
लोबो म्हणाले की, कचरा व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरले आहे. आजवर कोणाही राजकारण्याने हा विषय गंभीरपणे घेतला नाही आणि तोडगा काढण्यासाठीही प्रयत्न केला नाही. मी आमदार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याकडे हा विषय मांडला. त्यांनी गंभीरपणे दखल घेऊन जर्मन तंत्रज्ञानाचा साळगांव कचरा प्रक्रिया प्रकल्प आम्हाला दिला. कोमुनिदादच्या जागेत हा प्रकल्प आम्ही बांधला आहे.
साळगांवला सध्या १२५ टनी प्रकल्प आहे त्याची क्षमता वाढविणार आहोत. बायंगिणी प्रकल्पाचे काम पुढील चार पाच महिन्यात सुरु होईल. वेर्णा येथे तसेच कुंडई येथे जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्प येऊ घातला आहे. पुढील तीन वर्षात गोवा स्वच्छ व हरित बनविणे माझे ध्येय आहे.
एका प्रश्नावर लोबो म्हणाले की, राज्यात प्लास्टिक कचरा ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. हा कचरा विल्हेवाटीसाठी कर्नाटकला पाठवावा लागतो. सिमेंट कंपन्या प्लास्टिक कचरा घेतात. सिंगापूरला प्लास्टिक कचºयापासून वीज निर्मिती केली जाते. या प्रकल्पाची पाहणी आम्ही करुन आलो आहोत.
लोबो म्हणाले की, कचºयाच्या प्रश्नावर हायकोर्टात अनेक जनहित याचिका सादर करण्यात आल्या. सरकारसाठी ते मोठे आव्हानच ठरले होते. घराघरात रोज निर्माण होणाºया कचºयाबरोबरच हॉटेल्स तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांचा कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न होता. काही लोक विरोधासाठी विरोध करतात. साळगांवमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारतानाही अशच प्रकारच्या विरोधाला आम्हाला सामोरे जावे लागले. परंतु नंतर आम्ही लोकांची समजूत काढण्यास यशस्वी ठरलो.
दरम्यान, काकोडा येथे येऊ घातलेल्या कचरा प्रकल्पात कुठल्या भागातून कचरा यावा हे मंत्री निलेश काब्राल यांना विश्वासात घेऊनच ठरविले जाईल, असे लोबो यांनी एका प्रश्नावर सांगितले.