आंबेडकर भवनची पायाभरणी लवकरच: मुख्यमंत्री; १० कोटींचा निधी खर्चून पर्वरीत भवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:40 IST2025-04-15T12:38:48+5:302025-04-15T12:40:07+5:30
२१४० चौरस मीटर जागेवर हे भवन बांधले जाणार असून त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

आंबेडकर भवनची पायाभरणी लवकरच: मुख्यमंत्री; १० कोटींचा निधी खर्चून पर्वरीत भवन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप सरकार येत्या ६ महिन्यांत पर्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनची पायाभरणी करणार आहे. २१४० चौरस मीटर जागेवर हे भवन बांधले जाणार असून त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
समाज कल्याण खाते, गोवा राज्य अनुसुचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ यांच्यातर्फे पणजीतील आंबेडकर उद्यानामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते. अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात मागासवर्गीय समाजातील लोकांचा सन्मान करण्यात आला. खात्यातर्फे दिवसभर हा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच या सोहळ्यास उपस्थित लोकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी दालनेही लावण्यात आली होती.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पर्वरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावे, अशी मागणी मागासवर्गीय समाजातील प्रतिनिधी सरकारकडे करत होते. यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरू होते. शेवटी या प्रयत्नांना यश आले आहे. आता अत्याधुनिक असे आंबेडकर भवन असणार आहे. यात विद्यार्थ्यांना राहण्याची सोय तसेच इतर सोयसुविधा असणार आहेत. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात हे बाबासाहेबांचे ध्येय होते, ते भाजप सरकार पुढे नेत आहे. म्हणून आम्ही सहा महिन्यांत पायाभरणी करून लवकरच हा प्रकल्प पूर्ण करणार आहोत.
भाजप सरकार एससी, एसटी समाजासाठी विविध योजना राबवत आहे. अटल आसरा योजना असो किंवा सरकारी पातळीवरील मागासवर्गीयांसाठी आरक्षण योजना. समाजासाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभमिळवून दिला जात आहे. त्यामुळे जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण घेतात त्यांनी या अशा कार्यक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. आता एससी, एसटी समाजाच्या लोकांना जर चांगल्या सुविधा मिळत नसतील तर त्यांनी पुढे येऊन आपल्या समस्या मांडाव्यात सरकार त्याची दखल घेऊन त्या पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.