मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी चार नगरसेवकांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 09:39 PM2018-10-16T21:39:02+5:302018-10-16T21:39:07+5:30
मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी (दि.१७) सकाळी पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली असून, ह्या पदासाठी मंगळवारी (दि.१५) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
वास्को - मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी (दि.१७) सकाळी पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली असून, ह्या पदासाठी मंगळवारी (दि.१५) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. पालिकेच्या सध्याच्या सत्ताधारी गटातील नगरसेवक क्रितेश गावकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केलेला असून विरोध गटातील नगरसेवक फ्रेड्रीक्स हॅन्रीक, नंदादीप राऊत व निलेश नावेलकर यांनी नगराध्यक्षासाठी अर्ज दाखल केले आहेत. सध्याचे चित्र पाहता क्रितेश यांच्या गळ््यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार असल्याचे दिसून येत असले तरी ह्या निवडणूकीपूर्वी सध्या चालू असलेल्या राजकीय हालचाली पाहता मुरगावचा पुढचा नगराध्यक्ष कोण हे निवडणूकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
भावना नानोस्कर यांच्यावर अविश्वास ठराम संमत करून त्यांना ह्या खुर्चीवरून हटविल्यानंतर मुरगाव पालिकेचा नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता बैठक बोलवली आली आहे. पालिका सभागृहात सदर बैठक घेण्यात येणार असून मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक सदर निवडणूक बैठकीला निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुधवारी निवडून येणार असलेला नगराध्यक्ष मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष बनणार असून ही माळ कोणाच्या गळ्यात हे बुधवारी दुपारीच स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी भरण्यासाठी मंगळवार पर्यंत वेळ देण्यात आला असून ह्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांचे अर्ज आलेले असल्याची माहीती मुरगावचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडीस यांनी दिली. यात नगरसेवक क्रितेश गावकर, फ्रेड्रीक्स हॅन्रीक, नंदादीप राऊत व निलेश नावेलकर यांचा समावेश असल्याची माहीती त्यांनी पुढे दिली. क्रितेश गावकर यांनी ६ अर्ज भरलेले असल्याची माहीती आग्नेलो यांनी देऊन इतर तीन नगरसेवकांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केले असल्याचे सांगितले. मुरगाव पालिकेतील नगराध्यक्ष पदाबाबतचे सध्याचे राजकीय चित्र पाहता क्रितेश यांच्याच गळ््यात नगराध्यक्षाची माळ पडणार असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी गटात १३ तर विरोधी गटात १२ नगरसेवक असून १ मताने सत्ताधारीची बाजू बळकट असल्याने क्रितेश यांचा विजय होण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे. तसेच क्रितेश नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांच्या जवळीक असून त्यांचा पाठींबाही सत्ताधारी गटाला असल्याने सदर बाजू जास्त बळकट असल्याचे दिसून येत आहे.
विरोधी गटात १२ नगरसेवक असून ह्या गटाला आमदार कार्लुस आल्मेदा यांचा पाठींबा असून त्यांच्या गटातील नगरसेवकाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी मंगळवारी रात्री पर्यंत विविध प्रकारच्या राजकीय हालचाली चालू असल्याची माहीती सूत्रांनी दिली. ह्या गटातून तीन नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले अर्ज भरलेले असून बुधवारी सकाळी बैठक सुरू झाल्यानंतर यापैंकी दोन नगरसेवक अर्ज मागे घेणार असल्याचे समजते. सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक यांच्या फक्त एक मताचा फरक असून सध्या चाललेल्या विविध हालचालीतून ह्या क्रमांक संख्येत बदल सुद्धा होऊ शकतो अशी चर्चा असल्याने बुधवारी निवडणूक बैठक झाल्यानंतरच नगराध्यक्षाबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.