गोव्यात घराणेशाहीची लढत, चार जोडपी, कन्या व वडीलही रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 07:57 AM2022-01-29T07:57:06+5:302022-01-29T07:57:40+5:30
विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. घराणेशाहीविरुद्ध कायम बोलणाऱ्या भाजपने मंत्री विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट दिले
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यावेळी एकूण चार जोडपी उतरलेली आहेत. चारपैकी दोन जोडपी सत्ताधारी भाजपनेच रिंगणात उतरविली आहेत. या शिवाय कन्या व वडील तसेच दोन बंधू आपले भवितव्य अजमावत आहेत.
विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. येत्या १४ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. घराणेशाहीविरुद्ध कायम बोलणाऱ्या भाजपने मंत्री विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना तिकीट दिले. दिव्या आयुष्यातील पहिली विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरुद्ध त्यांचे सासरे व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना काँग्रेसने तिकीट दिले होते; पण त्यांनी माघार घेतली. यामुळे सूनविरुद्ध सासरे अशी लढत टळली.
महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात आणि त्यांचे आमदार पती बाबूश मोन्सेरात या दोघांनाही भाजपने तिकीट जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेतच. शिवाय त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उडी टाकली आहे. पत्नी सावित्री हिला मात्र भाजपने तिकीट दिले नाही, फक्त पती बाबू कवळेकर यांनाच दिले.
माजी मंत्री मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी डिलेयला लोबो यांनीही भाजपकडे तिकीट मागितले होते. भाजपने त्यांना तिकीट नाकारले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने लोबो पती-पत्नीला तिकीट दिले आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हे बाणावली मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत तर त्यांची कन्या वालंका नावेलीतून तृणमूलच्याच तिकीटावर रिंगणात उतरल्या आहेत.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दीपक ढवळीकर हे प्रियोळ मतदारसंघातून लढत आहेत तर त्यांचे बंधू व ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर हे मडकई मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. चार जोडपी यावेळी रिंगणात उतरली हा गोव्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे आमदार पांडुरंग मडकईकर हे यावेळी स्वत: लढत नाहीत पण त्यांनी त्यांच्या पत्नी जेनिता यांना भाजपचे तिकीट मिळवून देण्यात यश मिळवले आहे.