कोलवासह गोव्यातील चार प्रमुख खाड्या प्रदूषित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 04:42 PM2019-07-26T16:42:48+5:302019-07-26T16:56:35+5:30
कोलव्याच्या सुप्रसिद्ध खाडीसह गोव्यातील बहुतेक सर्व खाड्या प्रदूषित झाल्याची माहिती समोर आली आहे. या खाड्यांमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक तपासणीतून पुढे आला आहे.
मडगाव - कोलव्याच्या सुप्रसिद्ध खाडीसह गोव्यातील बहुतेक सर्व खाड्या प्रदूषित झाल्याची माहिती समोर आली आहे. या खाड्यांमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष गोवाप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक तपासणीतून पुढे आला आहे. कोलव्याबरोबरच पणजी येथील सांतइनेज खाडी त्याच बरोबर वेळसांव येथील दांडो मोळो ही खाडीही प्रदूषित झाली आहे.
कोलवा, सांतइनेज आणि बेतोडा येथील खाडीच्या पाण्याचे नमुने दर महिन्याला तपासले जात असून 2015, 2017 व 2018 या वर्षाच्या चाचणीतून हे भीषण सत्य पुढे आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाव्याप्रमाणे, सांतइनेजची खाडी मुख्यत: सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. या खाडीची व्यवस्थित सफाई होत नसल्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. या प्रदुषणामुळे पाणी खराब तर झाले आहेच त्याशिवाय या खाडीतील जलचराचेही जीव धोक्यात आले आहे. या खाडीतील प्रदूषण पाहता तिच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज मंडळाने व्यक्त केली आहे.
4 जून 2018 रोजी घेतलेल्या कोलवा खाडीतील पाण्याच्या नमुन्यातूनही मोठे प्रदूषण उघडकीस आले आहे. मंडळाच्या अहवालाप्रमाणे, या पाण्यातील बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि एकूणच कॉलिफॉर्मचे प्रमाण विहित क्षमतेपेक्षा बरेच जास्त आहे. बेतोडय़ाच्या नाल्याच्या पाण्याची तपासणी 13 एप्रिल 2017 रोजी करण्यात आली होती. यातही बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड प्रमाणाबाहेर अधिक असल्याचे स्पष्ट झाले होते. दांडो मोळो या खाडीचीही अवस्था अशीच बिकट असल्याचे मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, कोलवा खाडी साफ करण्यासाठी पाटबंधारे खात्याने लगेच काम हातात घेण्याचे ठरविले आहे. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर या कामाची निविदा जारी होऊ शकते अशी माहिती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिली आहे.