गोव्याचे चार मंत्री परदेश दौ-यावर, दोन मंत्री विदेशात घेणार उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 11:50 AM2018-08-20T11:50:57+5:302018-08-20T11:51:09+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील एकूण चार मंत्री सध्या विदेशात आहेत.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील एकूण चार मंत्री सध्या विदेशात आहेत. यापैकी मुख्यमंत्री पर्रीकर आणि ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे उपचारांसाठी गेले आहेत, तर दोघे मंत्री स्वत:च्या कामानिमित्त विदेशात आहेत. गोव्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे अजूनही मुंबईतील इस्पितळात उपचार घेत आहेत.
मंत्री मडकईकर यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर गेले तीन महिने ते इस्पितळात आहेत. आता ते उठून बसतात व बोलतात, असे त्यांच्या संपर्कात असलेल्या काही व्यक्तींनी सांगितले. मात्र त्यांना इस्पितळातून कधी डिस्चार्ज दिला जाईल याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यांना उपचारांसाठी अजून इस्पितळात रहावे लागेल, असे काही जणांनी सांगितले.
मुख्यमंत्री पर्रीकर हे उपचारांसाठी दुस-यांदा अमेरिकेला गेले आहेत. ते येत्या 23 किंवा 24 रोजी गोव्यात परततील असे भाजपमधून सांगितले जात आहे. मुख्यमंत्री न्यूयॉर्कमधील स्लोन केटरिग स्मृती इस्पितळात उपचार घेत आहेत. तिथेच उपचार घेण्यासाठी गोव्याचे नगरविकास मंत्री डिसोझा हे रविवारी रात्री रवाना झाले आहेत. डिसोझा यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांना गेले वर्षभर विविध ठिकाणी उपचार घेणो भाग पडले आहे. मंत्री डिसोझा हे गेले काही दिवस म्हापसा येथील आपल्या निवासस्थानी होते. ते सचिवालयात जात नव्हते. जमेल तेवढे शासकीय काम ते घरातूनच करत होते.
गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे आपल्या कामानिमित्त सध्या विदेशात आहेत. गेल्या 15 रोजी ते विदेश दौ-यावर गेले आहेत. कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या काही सहका-यांसोबत कॅनडा गाठले आहे. तेही काही दिवस विदेशात राहतील. गेले दोन-तीन आठवडे मंत्रिमंडळाच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. मुख्य सचिव धमेंद्र शर्मा आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील प्रधान सचिव कृष्णमूर्ती हे फोनवरून मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात, असे शासकीय सूत्रांनी सांगितले.
सध्या पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर व क्रीडा मंत्री बाबू आजगावकर हे गोव्यात आहेत.