गुजरातमधील बेपत्ता चार जण मडगावात सापडले, कोकण रेल्वे पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:17 PM2023-10-07T22:17:36+5:302023-10-07T22:20:03+5:30
या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुजरातमधील शानिबाग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मडगाव : गुजरातमधून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मुली, एक महिला आणि पुरुष गोव्यातील मडगाव येथे सापडले. येथील कोकण रेल्वे पोलिसांनी त्यांना शोधून काढले. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुजरातमधील शानिबाग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
अहमदनगर येथील शानिबाग पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुली तसेच हिरालबहेन भारतभाई कानुनगा व निलेश शर्मा हे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तक्रारीची नोंद घेऊन संबधित पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली असता, वरील चौघेही अहमदाबाद रेल्वे स्थानकावरुन गोव्याच्या दिशेने गेल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर तेथील पोलिसांनी याबाबत कोकण रेल्वे पोलिसांना माहिती दिली होती.
या माहितीच्या आधारे पाेलिसांनी तपासकामाला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानकावर पोलिस बंदोबस्त ठेवला गेला. गुजरातमधून आलेल्या रेल्वेत तपास केला असता, चौघेही सापडले. उपनिरीक्षक आयेशा म्हामल,हवालदार सत्यवान नाईक , पोलिस शिपाई समीर शेख, निलेश पागी व रोशनी चौधरी यांनी त्या चौघांनाही शोधून ताब्यात घेतले. शानिबाग पोलिसांना नंतर याबाबत कळविण्यात आल्यानंतर तेथील पाेलिसांनी मडगावात येऊन त्यांचा ताबा घेतला.