चार महिन्यानंतर गेबी फर्नांडिसला अटक, कोल्हापुरात घेतला होता आसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 05:35 PM2020-04-26T17:35:38+5:302020-04-26T17:36:08+5:30
गेबी मागचे काही महिने कोल्हापूर येथे आसरा घेऊन होता आणि लॉकडाउनमूळे राज्याच्या सीमा सील असतानाही तो गोव्यात आला.
मडगाव: गेल्या चार महिन्यांपासून गोवा पोलिसांना हुलकावणी देणारा अट्टल फरार गुन्हेगार गेबी फर्नांडिस याला रविवारी पहाटे कुडचडे पोलिसांनी अटक केली. सदर गुन्हेगार कोल्हापूरहुन गोव्यात आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला क्वारंटाईन करून ठेवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
गेबी मागचे काही महिने कोल्हापूर येथे आसरा घेऊन होता आणि लॉकडाउनमूळे राज्याच्या सीमा सील असतानाही तो गोव्यात आला. गेबी गोव्यात कसा आला याची तपासणी आता फातोरडा पोलीस करत आहेत. भाजीचा ट्रक मधून तो गोव्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
या आरोपीला मागच्या डिसेंबर महिन्यात कुंकळी पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. त्याची प्रकृती खराब झाल्याने त्याला होसोसिओ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला होता. त्यानंतर त्याने कोल्हापूर येथे आसरा घेतला होता.
काल आपल्या वृद्ध आईला भेटण्यासाठी तो घरी आल्याची माहिती कुडचडे पोलिसांना मिळाल्यानंतर आज पहाटे 5 वाजता त्याच्या घराला वेढा घालून कुडचडे पोलिसांनी त्याला अटक केली. यात पोलीस निरीक्षक रवी देसाई , पोलीस अविनाश नाईक व कुडचडेच्या अन्य पोलिसांनी मोलाची कामगिरी केली.
गोव्यातून फरार झाल्यानंतर गेबीने कोल्हापूरात आसरा घेतल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. शनिवारी तो कुळे येथे आला असून त्याची वृद्ध आई त्याला घेण्यासाठी कुळेला गेली आहे याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फिल्डिंग लावली पण गेबी दुसऱ्याच वाटेने आपल्या सावर्डे येथील घरी आला. कुडचडे पोलिसांनी रात्रीही त्याच्या घरावर छापा मारण्याचा प्रयत्न केला पण गेबीने रात्र एका डोंगरावर काढल्याने तो सापडू शकला नाही शेवटी रविवारी पहाटे तो पोलिसांच्या हाती लागला. नंतर त्याला फातोरडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी या धाडसी कामाबद्दल कुडचडे पोलिसांचे कौतुक केले आहे. संचारबंदी मोडून गेबी गोव्यात शिरला म्हणून त्याच्यावर आणखी एक गुन्हा नोंदविला जाईल असे त्यांनी सांगितले.