फोंड्यात दोन ठिकाणी झालेल्या विविध अपघातात चार जण जखमी
By आप्पा बुवा | Published: October 30, 2023 06:50 PM2023-10-30T18:50:14+5:302023-10-30T18:50:36+5:30
अज्ञात कारने स्कुटरला ठोकर दिल्याने विशाल गावडे (वेलिंग) व जयेश गावडे (वेलिंग) हे दोघेजण जखमी झाले.
फोंडा : फोंडा व धारबांदोडा परिसरात रविवारी रात्री उशिरा झालेल्या दोन अपघातात चार जण जखमी होण्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्तानुसार बायथाखोल - बोरी येथे जीए -०५- क्यू- ३५६२ क्रमांकाची दुचाकी घेऊन रविवारी रात्री ८ वाजण्याच्या वेलिंग येथील युवक जात होते. अज्ञात कारने स्कुटरला ठोकर दिल्याने विशाल गावडे (वेलिंग) व जयेश गावडे (वेलिंग) हे दोघेजण जखमी झाले.
अपघातानंतर कार चालकाने कारसह अपघात स्थळावरून पळ काढला. मागून येणाऱ्या काही वाहन चालकांच्या लक्षात सदरचा अपघात येताच त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. जखमी झालेल्या दोघांना अगोदर फोंडा येथील सब जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर दोन्ही युवकांना अधिक उपाचारासाठी बांबोळी येथील गोमेकोत दाखल करण्यात आले आहे.
सदर अपघातास कादंब ठरलेल्या वाहनाचा व वाहन चालकाचा फोंडा पोलीस शोध घेत आहेत. सहायक उपनिरीक्षक रोहिदास भोमकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. दयानंदनगर- धारबांदोडा येथे रविवारीच झालेल्या आणखीन एका अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. दयानंदनगर- धारबांदोडा येथे रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास जीए-०८- झेड-९३६३ क्रमांकाचा मालवाहू ट्रक त्याच दिशेने जाणाऱ्या केए -३२-डी-०१६१ क्रमांकाच्या काँक्रीटवाहू ट्रकला ओव्हरटेक करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या केए -२९-सी-०६५७ क्रमांकाच्या माल वाहतूक ट्रकला धडक बसली.
विचित्र पद्धतीने झालेल्या अपघातात तिन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात दोन्ही ट्रकचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत. फोंडा पोलीस स्थानकाचे सहायक उपनिरीक्षक सुधार गावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.