भविष्यात चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम
By admin | Published: February 27, 2015 02:10 AM2015-02-27T02:10:32+5:302015-02-27T02:14:21+5:30
पणजी : राज्यात तयार होणाऱ्या शिक्षकांमध्ये सेवाभाव, त्याग, सामाजिक बांधिलकी अशा प्रकारच्या भावना असाव्यात, या हेतूने यापुढे शिक्षकांसाठी चार
पणजी : राज्यात तयार होणाऱ्या शिक्षकांमध्ये सेवाभाव, त्याग, सामाजिक बांधिलकी अशा प्रकारच्या भावना असाव्यात, या हेतूने यापुढे शिक्षकांसाठी चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम राबविण्याचा प्रस्ताव आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले.
प्राथमिक ते बारावी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या ज्या शिक्षकांनी सेवेत २४ वर्षे पूर्ण केली, त्यांना सिलेक्शन ग्रेड पार्सेकर सरकारने आता लागू केली आहे. ‘लोकमत’नेच गुरुवारी याविषयीचे वृत्त दिले. शिक्षकांमध्ये त्यामुळे अत्यंत समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार शिक्षकांना कधी रस्त्यावर येऊ देणार नाही. सरकार त्यांचे प्रश्न सोडवील; पण शिक्षकांकडून सरकारच्या व समाजाच्याही काही अपेक्षा आहेत. शिक्षकी पेशा हा मानाचा पेशा आहे. नावापुरती किंवा पगारापुरती शिक्षकांनी नोकरी न करता चांगल्या समाजाच्या उभारणीत योगदान द्यावे, असे सरकारला अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्तीला शिक्षकी पेशात यायचे आहे, त्या व्यक्तीने बारावीनंतर चार वर्षे बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्यासाठी स्वतंत्रपणे वेगळी वर्षे द्यावी लागणार नाहीत. बीएस्सी किंवा बीए करत असतानाच महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रथम वर्षापासूनच असे विद्यार्थी बीएड अभ्यासक्रम करू शकतील. तशी सोय सरकार करील. तसा इंटिग्रेटेड पद्धतीचा अभ्यासक्रम गोव्याबाहेर उपलब्ध असून आम्ही आगामी काळात गोव्यात हा अभ्यासक्रम राबविणे सुरू करणार आहोत. सरकारचे ते एक ध्येय आहे.
(खास प्रतिनिधी)