चार वर्षांत पंतप्रधान मोदींनी केले 41 विदेश दौरे, गिनीज बुकमध्ये नाव नोंदवा, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 08:00 PM2018-07-11T20:00:02+5:302018-07-11T20:00:13+5:30
गेल्या चार वर्षांच्या काळात ४१ विदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे.
पणजी : गेल्या चार वर्षांच्या काळात ४१ विदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. ५२ राष्ट्रांमध्ये त्यांनी केलेल्या या दौऱ्यांवर ३५५ कोटी ३0 लाख ३८ हजार २६५ रुपये खर्च झाले. आजवर कुठल्याही पंतप्रधानाने एवढे विदेश दौरे केले नाहीत. मोदी यांनी गेल्या चार वर्षात तब्बल १६५ दिवस विदेश दौ-यांवर घालवल्याचा आरोपही आरटीआय माहितीचा हवाला देऊन काँग्रेसने केला आहे.
पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी याबाबत आपण लंडनला गिनीज वर्ल्ड रिकॉर्डच्या कार्यालयाला पत्र लिहून विनंती केली असल्याचे सांगितले. पंतप्रधानांच्या या घाऊक विदेश दौ-यांवर त्यांनी टीका केली. आमोणकर म्हणाले की, रुपयाचे अवमूल्यन झालेले मोदी यांनी पंतप्रधान बनण्यापूर्वी रुपयाचे वाढविण्यासाठी प्रयत्य करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या केवळ वल्गनाच ठरल्या, अशी टीकाही आमोणकर यांनी केली. मोदी यांच्या दौ-याची माहिती बंगळुरु येथील काँग्रेसच्या एका हितचिंतकाने आरटीआय अर्जातून मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्यावर पॅरा शिक्षक आंदोलन प्रकरणात गुन्हा नोंदवून तसेच नेत्रावळीच्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात नावाची वाच्यता केल्याचा आरोप ठेवून छळ चालला असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला. आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्ह्यांमध्ये अडकविले जात आहे, असे ते म्हणाले.
पक्षाचे अन्य एक प्रवक्ते ऊर्फ मुल्ला यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर त्यांचेच सहकारी मंत्री गोविंद गावडे आणि जयेश साळगावकर हे निष्क्रियतेचा आरोप करीत असल्याकडे लक्ष वेधताना ढवळीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. २४ तास पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. सासष्टी तसेच इतर भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. मेरशी, सांताक्रूझ येथे २ हजार लिटरची टाकी बांधली. त्यावर तब्बल २ कोटी रुपये खर्च केले. परंतु या टाकीचा उपयोग होत नाही. चिंबल, मेरशीला पाण्याची टंचाई आहे. नावेलकर रेसिडेन्सीमध्ये लोकांना पिण्याचे पाणी नाही. २ लाख लिटरची टाकी तेथे विनावापर आहे. लोकांना टँकरने पाणी मागवावे लागते. पक्षाचे पदाधिकारी विठू मोरजकर म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात भाजप पदाधिका-यांविरुद्ध म्हापसा तसेच पणजी पोलीस स्थानकांमध्ये तक्रार नोंदवूनही पोलिसांकडून काही कारवाई झालेली नाही.