कोविडची चौथी लाट; गोव्यात एकाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा झाली सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 08:45 AM2023-03-31T08:45:40+5:302023-03-31T08:46:25+5:30
गोव्यात पुन्हा एकदा कोविड मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात पुन्हा एकदा कोविडची दहशत पसरत आहे. एक वर्षानंतर काल, गुरुवारी राज्यात कोविडने पहिला बळी घेतला आहे. गोमेकॉत एका रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आली. यावरून कोविडचे संकट अजून टळलेले दिसत नाही.
एका रुग्णाचा गोमेकॉत मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा सक्रिय केली जात आहेत. २४ तासांत आढळणाऱ्या कोविड बाधितांतही झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी जाहीर केलेल्या ९५९ चाचणी अहवालातून १०८ पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर २४ तासांत १६ जण कोविडमधून बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या ४५३ इतकी झाली आहे. नव्याने आढळलेल्या १०८ पैकी १०१ जण गृहविलगीकरणात आहेत, तर ७ जण इस्पितळात आहेत. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोविड मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याची सक्ती करण्यात आलेली नाही. कोविडचे संकट देशावर पुन्हा येत असल्याचे संकेत असून २४ तासांत देशात कोविड बाधितांच्या संख्येत ४० टक्के वाढ झाली आहे.
चाचण्यांसाठी धाव
कोविडची लाट उतरल्यानंतर चार महिन्यांचा कालावधी असा होता की कोविड चाचणी केंद्रावर सहसा कुणीही फिरकत नव्हते. केवळ शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी कोविड चाचण्या सक्तीच्या होत होत्या. मात्र आता चाचणी केंद्रावर पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. गुरुवारी १ हजारांहून अधिक लोकांनी चाचण्या करून घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
निवासी डॉक्टरही बाधित
कोविड महामारीचा धोका अधिक तीव्र अशावेळी बनतो जेव्हा उपचार करणारे डॉक्टरच बाधित होऊन घरी बसतात. नेमके तसेच संकेत दिसत आहेत. गोमेकॉच्या हॉस्टेलमध्ये राहणारे काही निवासी डॉक्टरही कोविड बाधित झाल्याची माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आली.
बूस्टर डोस नाही
कोविड महामारी संपली असे समजून कोविडविरोधी लसीकरणाकडे लोकांनी पाठ फिरविली होती. परंतु आता पुन्हा कोविडचे संकट आल्यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी अनेकांची धडपड चालली आहे; परंतु बूस्टर डोस उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य खात्याकडून अद्याप लसीकरण सुरु केलेले नाही. डोस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहीम हाती घेतली जाईल अशी माहिती आरोग्य खात्याचे साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली.
देशात ३०१६ रुग्ण
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३०१६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामागे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट एक्सबीबी.१.१६ कारण असल्याचे मानले जात आहे. जागतिक आरोग्य संघटने एक्सबीबी. १.१६ प्रकार किती धोकादायक आहे, याची माहिती दिली आहे. जगभरात एक्सबीबी. १.१६ व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे भारतात आहेत. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट सध्या वातावरणात उपस्थित आहे आणि याच्यामध्येच जेनेटिक म्यूटेशन होत आहे. त्यातूनच हा नवीन एक्सबीबी. १.१६ व्हेरिएंट आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"