पोस्टाची फ्रेंचायझी घ्या, २५ टक्क्यांपर्यंत कमशिन मिळवा; मिळकतीची नवी संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 10:46 AM2024-01-30T10:46:24+5:302024-01-30T10:47:35+5:30
पाच हजार रुपये भरून मिळणार फ्रेंचायझी.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पोस्ट खात्याकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लोकांना मोठा आर्थिक फायदा तर होत आहेच; पण आता पोस्ट खात्याकडून फ्रँचायझी योजनाही राबविली जात आहे.
याअंतर्गत फ्रँचायझी घेणाऱ्यांना २५ टक्क्यांपर्यंत कमिशन दिले जात आहे. यामुळे आर्थिक लाभ प्राप्त होत आहे. सदर योजना ही देशभरात राबविली जात असून गोव्यातही सुरू आहे. गोव्यात या योजनेला तितकासा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या योजनेबाबत अधिक जागृती होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कोणती कागदपत्रे हवीत?
पोस्ट खात्याची फ्रेंचायझी घेण्यास इच्छुक असलेल्यांनी खात्याकडे ठराविक कागदपत्रे आपल्या अर्जासोबत जोडावीत. यात आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, वयाचा दाखला, दहावीचे प्रमाणपत्र, पीपीओची प्रत (टपाल विभागात पेन्शन घेत असल्यास) रहिवाची पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो याचा समावेश असावा.
कोणाला मिळेल?
पोस्टाची फ्रेंचायझी घेण्यास इच्छुक असलेली व्यक्त्ती ही भारताची नागरिक असावी, फ्रेंचायझी घेण्यासाठी सदर व्यक्त्तीचे वय १८ वर्षांवरील असावे तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून इयत्ता ८वी पेक्षा अधिकचे शिक्षण असणे आवश्यक आहे. तो ही फ्रँचायझी घेण्यासाठी पात्र ठरू शकतो.
५ हजार गुंतवा
पोस्ट खात्याची फ्रेंचायझी घेण्यासाठी केवळ ५ हजार रुपये गुंतविण्याची गरज आहे. पोस्ट ऑफिसच्या फ्रेंचायझी दोन प्रकारच्या असतात- फ्रँचायझी आउटलेट आणि पोस्टल आउटलेट. फ्रेंचायझी सुरू करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमधून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात.
कमिशन कसे मिळते?
नोंदणीकृत सेवांची बुकिंग करण्यासाठी प्रती ३ रुपये, प्रति स्पीड पोस्ट आर्टिकल बुकिंगसाठी ५ रुपये, मनिऑर्डरच्या बुकिंगवर १०० ते २०० रुपये कमिशन, २०० रुपयांच्या जास्त मनिऑर्डर बुकिंगवर ३.५० ते ५ रुपये कमिशन. प्रत्येक महिन्याला १ हजारपेक्षा जास्त रजिस्ट्री किवा स्पीड पोस्ट आर्टिकल २० टक्के अतिरिक्त कमिशन आदी दिले जाते.