फ्रान्सिस्को काव्र्हालो खून प्रकरण: संशयित विल्टन कुतिन्हो हा तियात्रत काम करीत होता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 11:51 PM2019-09-09T23:51:00+5:302019-09-09T23:51:14+5:30
फ्रान्सिस्को याला मारहाणीचा हा प्रकार राय-मनोरा येथे कार्लटन बारजवळ घडला होता.
मडगाव: गोव्यातील वाशे - लोटली येथे फ्रान्सिस्को काव्र्हालो (33) खून प्रकरणात अटक केलेला एक संशयित हा तियात्र कलाकार असून आज सोमवारी त्याचा तियात्रचा प्रयोगही होता.मात्र खून प्रकरणात तो गजाआड झाल्याने ऐनवेळी त्याच्या ऐवजी दुस:या कलाकाराला घेउन निर्मात्याला आपला तियात्र सादर करावा लागला. विल्टनला अटक केल्यानंतर तो तियात्रत काम करीत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले होते. या प्रकरणातील अन्य एक संशयित मेल्बर्न कुतिन्हो हा हल्लीच जीवरक्षक म्हणून कामाला लागला होता. काव्र्हालो याच्या खून प्रकरणात मायणा - कुडतरी पोलिसांनी विल्टन व मेल्बर्न याच्यासहीत रॉयन आल्वारिस व वालेन्सियो वाझ या चार जणांना अटक केली आहे तर अन्य दोन संशयित सदया फरार आहे. सर्व संशयितांना दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून फ्रान्सिसचा खून झाला हेही तपासात उघड झाले आहे. दारुचे व्यसनच या संशयितांना शेवटी तुरुगांच्या चार भिंतीआड घेउन गेले. दरम्यान अटक केलेल्या संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, पुढील तपास चालू असल्याची माहिती मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांनी दिली.
फ्रान्सिस्को याला मारहाणीचा हा प्रकार राय-मनोरा येथे कार्लटन बारजवळ घडला होता. या बारमध्ये सर्व सहा संशयित दारु पित बसलेले असताना त्यापूर्वी आणखी दोन बारमध्ये जाऊन दारु पिऊन तर्र होऊन आलेला फ्रान्सिस्को या बारमध्ये येऊन दारुसाठी मोठमोठय़ाने दंगा करु लागला. त्यामुळे संशयित खवळले. त्यांची मयताकडे बाचाबाची झाली त्यानंतर रागाच्या भरात संशयितांनी त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने वार केले होते. या मारहाणीने मयत बेशुद्ध होऊन पडला असता संशयितांनी त्याला आपल्या मोटरसायकलवर बसवून वाशे-लोटली येथे पुलाजवळ नेऊन टाकून दिले होते.
6 सप्टेंबर रोजी पोलिसांना बोरी पुलाच्या खाली मृतदेह असल्याचे कळविल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पहाणी केली असता मृताच्या अंगावर चार जखमा सापडल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला होता.मागाहून या प्रकरणाचा तपास करुन वरील चार संशयितांना अटक केली होती. त्यांच्या अन्य दोन साथिदारांचा सदया शोध चालू आहे.
फ्रान्सिस्को काव्र्हालो याला दारुचे व्यसन होते. काही वर्षापुर्वी तो विदेशात कामाला होता. गावात तो लहानसहान कामे करीत होता. ज्या दिवशी खूनाची घटना घडली, त्या दिवशी त्याने बरीच दारु ढोसली होती. एकूण तीन बारात दारु पिउन तो राय - मनोरा येथील कार्लटन बारमध्ये दारु प्यायला आला होता. मात्र बार बंद असल्याने त्याने नंतर मोठयामोठया आवाज करुन तेथे दंगा घालण्यास सुरुवात केली होती. यावेळी तेथे तेथे दारु पित बसलेल्या संशयिताने रागाने त्याला मारहाण केली होती. मयत फ्रान्सिस्को याचे दोन भाउ परदेशात कामाला आहे. फ्रान्सिस्कोलाही ते परदेशात कामाला नेणार होते. पुढच्या महिन्यात तो विदेशात जाणार होता. मात्र त्यापुर्वीच दारुच्या व्यसनाने त्याचा घात केला.