पणजीत पदव्या देणारी फॅक्टरी; पती बनले प्राचार्य, पत्नी व मुले फ्रंट ऑफिस स्टाफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2024 10:23 IST2024-12-12T10:21:35+5:302024-12-12T10:23:04+5:30
संचालक व इतर अटकेत, पोलिसांकडून धरपकड

पणजीत पदव्या देणारी फॅक्टरी; पती बनले प्राचार्य, पत्नी व मुले फ्रंट ऑफिस स्टाफ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: शिक्षण नसतानाही पदवी प्रमाणपत्रे देण्याचे कारनामे करणारी एक फॅक्टरीच गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. पणजीत ऑफिस थाटलेल्या या बोगस संस्थेचे पती बनले प्राचार्य तर पत्नी व मुले बनली होती फ्रंट ऑफिस स्टाफ, या प्रकरणात पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.
बोगस प्रमाणपत्रे घेऊन गेलेले तिघेजण पोलिसांना सापडले होते. त्यात नीरज गावडे, विष्णुदास भोमकर आणि यशवंत खोलकर यांचा समावेश आहे, तसेच बिंदी परब आणि भावेश हळदणकर या दोघा एजंटना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि त्यांची पाळेमुळे ग्रेस इन्स्टिट्युशन ऑफ एज्युकेशन, तसेच विक्रांत एमटीजी अॅण्ड टेक्नॉलॉजी या बोगस संस्थांपर्यंत येऊन पोहोचली.
या प्रकरणात प्रदीप हळर्णकर ऊर्फ विक्रांत हळर्णकर याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. परंतु या बोगस संस्थेचे प्राचार्य म्हणविणारा जगदीशचंद्र खंडपाल आणि स्वतःला फ्रंट ऑफिस स्टाफ म्हणविणारी त्याची पत्नी सिंथिया खंडपाल आणि मुलगी स्विझेल खंडपाल अद्याप मोकळ्या आहेत.