राज्यात ठकसेनांचा महापूर; शिक्षकाने उकळले १ कोटी २० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 12:17 PM2024-11-12T12:17:41+5:302024-11-12T12:18:39+5:30
नोकऱ्यांचे आमिष
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : पैशांच्या बदल्यात सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नवनवे मासे गळाला लागत आहेत. रविवारी रात्री उशिरा या प्रकरणात चक्क एका शिक्षकाला अटक करण्यात आली. योगेश शेणवी- कुंकळीकर (३९, रा. ढवळी-फोंडा), असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव असून, तो एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
दरम्यान, या प्रकरणात एक महिलासुद्धा गुंतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षक असलेल्या योगेश कुंकळीकर याने काही लोकांकडून नोकरी देण्याच्या बदल्यात लाखो रुपये घेतले. त्याने ही रक्कम मध्यस्थ म्हणून स्वीकारली.
पोलिसांनी सांगितले की, सरकारी नोकरीचे आमिष दाखवून योगेशने २० लोकांकडून पैसे घेतले आहेत. एकूण एक कोटी २० लाख ५० हजार रुपये त्याने उकळले आहेत. त्याने ज्या व्यक्तीकडे हे पैसे सुपुर्द केले आहे. ती व्यक्ती कोण? याचा तपास सुरू आहे.
स्वतःच पोलिस स्थानकात हजर
ज्याप्रमाणे संदीप परब हा स्वतःहून म्हार्दोळ पोलिस स्थानकात दाखल झाला होता, त्याचप्रमाणे योगेश कुंकळीकर हा रविवारी सकाळी पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्याने नोकरीच्या बदल्यात एकाला पैसे दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेतली आणि त्याला जाऊ दिले. त्याला काहीच थांगपत्ता लागू दिला नाही. तपास केल्यानंतर सगळे पुरावे गोळा करून पोलिसांनी योगेशला अटक केली.
उपजिल्हाधिकारी पदासाठी १२ लाख रुपयांचे टोकन
नागेशी येथील संगम बांदोडकर याने आपल्या मुलीच्या नोकरीसंदर्भात योगेश याच्याकडे संपर्क साधला. चक्क उपजिल्हाधिकारी पदासाठी हा सौदा ठरला. बांदोडकर याने जुलै महिन्यात सुरुवातीला टोकन म्हणून बारा लाख रुपये कुंकळेकर यांच्या स्वाधीन केले. मात्र नंतर आपण फसवलो गेलो, याची कुण कुणलागताच त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
तीन दिवसांची कोठडी
सोमवारी संध्याकाळी योगेश कुंकळीकरला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. यासंदर्भात त्याने नेमके पैसे कुणाला दिले, या प्रकरणात अजून कोण सामील आहेत, त्याची माहिती योगेशकडून घ्यायची आहे, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.
माजी विद्यार्थीसुद्धा फसले?
मिळालेल्या माहितीनुसार, योगेशने सुरुवातीला आपल्या ओळखीच्या लोकांना नोकरीच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनंतर त्याने माजी विद्यार्थ्यांनासुद्धा नोकरी देण्याचे आमिष दाखवले. काही माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा त्याच्याकडे नोकरीच्या आशेने पैसे जमा केल्याचा संशय आहे.
शिक्षकच गुंतले गैरव्यवहारांत
माशेलमधील प्रकरणात एका मुख्याध्यापिकेला अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीकडून अशा प्रकारची आमिषे दाखवून फसवणूक केल्याचा हा दुसरा प्रकार उघड झाला. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलेल्या दीपश्री सावंतचा पोलिस रिमांड मंगळवारी संपत आहे. तर पूजा नाईक म्हार्दोळ पोलिसांच्या ताब्यात आहे.
कनिष्ठ अभियंता परबवर कारवाई होणार : शिरोडकर
नोकरी विक्री प्रकरणी अटकेतील संदीप परब हा जलस्रोत खात्याचा कनिष्ठ अभियंता असून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे खात्याचे मंत्री मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. शिरोडकर म्हणाले, 'कनिष्ठ अभियंत्यासारखे लोक अशी फसवणूक करतात, हे पाहून खेद वाटतो. जे कोणी नोकऱ्यांसाठी पैसे घेत आहेत त्यांना तुरुंगाची हवा खावीच लागेल. ते म्हणाले की, 'नोकऱ्या विक्री प्रकरणांमध्ये आतापर्यंत अनेकांना अटक झालेली आहे. त्यावरुन लोकांपर्यंत स्पष्ट संदेश गेलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध सुरू केलेली कारवाई वाखाणण्याजोगी आहे. मी याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतो.'