दुबईत नोकरीच्या बहाण्याने फसवणूक
By काशिराम म्हांबरे | Published: August 18, 2023 07:50 PM2023-08-18T19:50:21+5:302023-08-18T19:50:38+5:30
नोकरीच्या नावे संशयितांनी फिर्यादींकडून ४ लाख ७० हजार रुपए रक्कम घेतली.
काशीराम म्हांबरे
म्हापसा-विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बार्देश तालुक्यातील खोर्जुवे-हळदोणा येथील एका युवकाला संशयितांनी ४.७० लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी शेख समीर उर्फ समीर मोहीदीन शेख (नावेली - सासष्टी), मेसर्स नूर अल मारीजन टुरीझमचे सायद शेफ व इतर तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
गेल्या ५ एप्रिल ते १६ जून २०२३ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी ज्योएल कॅजिटन सिक्वेरा (खोर्जुवे-हळदोणा) हे पूर्वीच वरील दोघा संशयितांना ओळखत होते. त्यामुळे त्यांनी संशयितांना नोकरी संदर्भात विचारले. तेव्हा संशयितांनी दुबईमध्येच चांगली नोकरी मिळवून देण्याची त्यांना हमी दिली.
फिर्यादी पुर्वी दुबईमध्ये नोकरीला होते. करोना काळात ते गोव्यात परतले होते. आता त्यांना पुन्हा दुबईमध्ये नोकरीसाठी जायचे होते. नोकरीच्या नावे संशयितांनी फिर्यादींकडून ४ लाख ७० हजार रुपए रक्कम घेतली.
पण त्याबदल्यात नोकरी मिळवून दिली नाही आणि पैसेही परत केले नाही. त्यानंतर फिर्यादी ज्योएल यांनी म्हापसा पोलिसांत फसवणूकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविरूध्द भादंसंच्या ४२० व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिताकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब हे करीत आहेत.