स्वातंत्र्य सेनानी रानडे यांच्या अस्थींचे गोव्यातील मांडवी नदीत विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 07:52 PM2019-07-03T19:52:59+5:302019-07-03T19:53:11+5:30
स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या अस्थींचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी पणजीतील मांडवी नदीत विसर्जन करण्यात आले.
पणजी : स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या अस्थींचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी पणजीतील मांडवी नदीत विसर्जन करण्यात आले. रानडे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी गेल्या आठवडय़ात पुणे येथे निधन झाले. रानडे यांनी गोव्याला पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी सशक्त लढा पुकारला होता. आझाद गोमंतक दलाचे ते सदस्य होते. सांगलीला जन्मलेले रानडे हे गोव्यात शिक्षक म्हणून आले व गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला. बेती येथील पोलीस स्थानकावर त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पोर्तुगीजांनी त्यांना पकडले व प्रथम आग्वादच्या तुरुंगात तर नंतर पोर्तुगालच्या तुरुंगात नेऊन ठेवले होते. गोवा जरी डिसेंबर 1961 साली स्वातंत्र्य झाला तरी, रानडे मात्र त्यानंतरही काही वर्षे पोर्तुगालच्या तुरुंगातच होते. त्यांची सुटका झाल्यानंतर ते गोव्यात येऊन काही वर्षे राहिले होते. मग ते सपत्नीक पुणे येथे गेले. तिथेच त्यांनी देह ठेवला.
रानडे यांच्या अस्थींचा कलश बुधवारी पणजीत आणण्यात आला. मुख्यमंत्री सावंत यांनी या कलशाचे स्वागत केले. येथील मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात या अस्थी लोकांच्या दर्शनासाठी दिवसभर ठेवण्यात आल्या. मुख्यमंत्री सावंत आणि इतर काही मंत्री तसेच भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांनी रानडे यांच्या कार्याचा गौरव केला व गोवा त्यांना कधी विसरणार नाही हे स्पष्ट केले. मांडवी नदीत सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अस्थींचे विसजर्न करण्यात आले. त्यावेळी नगर विकासमंत्री मिलिंद नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. अनेक गोमंतकीयांनी बुधवारी मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात येऊन रानडे यांच्या अस्थींचे दर्शन घेतले व आपल्या भावनाही व्यक्त केल्या.