मिशन बायपाससाठी मोर्चा

By admin | Published: May 28, 2016 02:37 AM2016-05-28T02:37:45+5:302016-05-28T02:37:45+5:30

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री

Front for mission bypass | मिशन बायपाससाठी मोर्चा

मिशन बायपाससाठी मोर्चा

Next

पणजी : खनिज वाहतुकीमुळे केपे, सांगे भागात अपघातांचे सत्र सुरूच झाल्याने २०१२ साली उगे येथे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पायाभरणी केलेल्या बगलरस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी केपे व सांगेतील नागरिकांनी शुक्रवारी येथे मोर्चा काढला. त्यानंतर आझाद मैदानावर झालेल्या सभेत खनिज व्यवसायप्रश्नी गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत मिशन बायपासच्या वतीने येत्या दोन आठवड्यांत हस्तक्षेप याचिका सादर करण्यात येईल, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.
२०१२ मध्ये उगे येथे खनिज व्यवसायासाठी वेगळ्या बगलरस्त्याची पायाभरणी केली होती. सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, नंतर ते काम तसेच ठेवण्यात आले. त्या पायभरणीच्या दगडाच्या प्रतिमेला आंदोलकांनी फुलांचा हार घालून श्रध्दांजली वाहिली. तसेच पणजी बसस्थानक ते आझाद मैदानपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात महिला व लहान मुलेही सहभागी झाली होती. आंदोलकांनी या वेळी ‘विकास नाका हाय क्लास, पयली करात बायपास’ अशा घोषणा दिल्या. या वेळी इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे, शिक्षक मिनिन फर्नांडिस, मिशन बायपासचे निमंत्रक प्रदीप काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
२००८ पासून आम्ही हे मिशन बायपास आंदोलन छेडले आहे. आतापर्यंत सरकारला भरपूर मुदत दिली आहे. आता आणखी थांबणार नाही, असे प्रदीप काकोडकर यांनी सांगितले. शेकडो लोकांचा बळी या खनिज वाहतुकीमुळे गेला आहे. खनिज व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सरकारने पूरक साधनसुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. हे सरकार फक्त खजिन व्यावसायिक लॉबीचाच विचार करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
हा बगलरस्ता लोकांच्या पैशातून नव्हे तर खनिज व्यावसायिकांकडून पैसे घेऊन बांधण्यात यावा. नाही तर या रस्त्यासाठी खनिज वाहतूक करणाऱ्यांना टोल लावून निधी उभा करावा, असे काकोडकर म्हणाले. सरकारची आशा वाढली असून या सरकारला फक्त खनिज व्यावसायिकांचे पडले आहे. सामान्य लोकांचा विचार हे सरकार करीत नाही. किती तरी लोकांचे प्राण या वाहतुकीमुळे गेले आहेत. मात्र, सरकारला लोकांच्या जीवनाचे पडलेले नाही. आमची सहनशीलता संपली असून आम्ही आणखी बळी जाऊ देणार नाही, असे काकोडकर यांनी सांगितले.
आणखी किती मरणांची हे सरकार वाट बघणार, असा प्रश्न मार्टिन्स फर्नांडिस यांनी केला. लोकांचे प्राण आणखी संकटात न टाकता या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, असे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)

Web Title: Front for mission bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.