फादर बिस्मार्कच्या मृतदेहावर ३ वर्षांनी होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 02:49 PM2018-11-05T14:49:12+5:302018-11-05T14:50:05+5:30
6 नोव्हेंबर रोजी सांतइस्तेव येथील नदीत बुडून फादर बिस्मार्क यांचे निधन झाले होते.
पणजीः फादर बिस्मार्क यांच्या मृतदेहावर शेवटी तीन वर्षांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे. मंगळवार दि. 6 नोव्हेंबर रोची सांत इस्तेव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
6 नोव्हेंबर रोजी सांतइस्तेव येथील नदीत बुडून फादर बिस्मार्क यांचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण उघड न झाल्यामुळे एकच संशयकल्लोळ उडाला होता. कुटुंबियांसह अनेक समाजसेवी संस्थांकडून घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे जुने गोवा पोलिसांनी चौकशी करून अहवाल दिला होता. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यासाठी वैद्यकीय अहवालाचा निर्वाळा देण्यात आला होता. या तपासावर कुटुंबियांनी समाधान न मानल्यामुळे हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्या तपासातही बिस्मार्क यांचा बुडूनच मृत्यू झाल्याचे म्हटले होते.
कुटुंबियांनी त्यावरही समाधान न मानता बिस्मार्क यांचा खूनच झाल्याचा दावा केला होता आणि जोपर्यंत खुन्याचा पत्ता लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मागील 3 वर्षे मृतदेह गोमेकॉच्या शवागरात पडून होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठातही कुटुंबियांनी आव्हान दिले होते. अनेक सुनावण्या व आदेशानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे.