पुढील आठ दिवस तापमानात आणखी वाढ : जनतेने काळजी घ्यावी हवामान खात्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 03:48 PM2024-05-01T15:48:20+5:302024-05-01T15:48:36+5:30
राज्यात सध्या सरासरी तापमान ते ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ३६ पर्यंत जाणार आहे.
पणजी (नारायण गावस): राज्यात पुढील आठ दिवस तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. राज्यात सध्या सरासरी तापमान ते ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ३६ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे.
राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे.
बुधवारी हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान होते. बुधवारी मुरगाव येथे कमाल ३४.४ अंश तर किमान २७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पणजीतील कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस झाले होते. पणजीतील किमान तापमान सामान्य किमान तापमानपेक्षा १.२ अंश सेल्सिअसने वाढून २७.५ अंश सेल्सिअस झाले होते.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तसेच ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच १ ते ७ मे दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यताही आहे. या वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सरखे आजार जडले आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य खात्याने लाेकांना केले आहे.