विज्ञानाची रुची विद्यार्थ्यांमध्ये तयार झाली तरच भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होतील: लेविन्सन मार्टिन
By समीर नाईक | Published: February 26, 2024 04:44 PM2024-02-26T16:44:43+5:302024-02-26T16:44:54+5:30
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत विकसित भारतचे जे लक्ष्य ठेवले आहे, त्या माध्यमातून ते साध्य होऊ शकते."
पणजी: शालेय स्तरावरून विज्ञानाची रुची विद्यार्थ्यांमध्ये तयार होणे आवश्यक आहे, तरच भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत विकसित भारतचे जे लक्ष्य ठेवले आहे, त्या माध्यमातून ते साध्य होऊ शकते. या सर्व गोष्टींत शाळा व शिक्षक यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे, असे मत विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे संचालक लेविन्सन मार्टिन यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून गोवा विज्ञान केंद्रातर्फे सोमवारी खास विज्ञान फिएस्टा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने लेविन्सन मार्टिन बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सन्मानीय पाहुणे म्हणून मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक उमेश कुमार रुस्तगी व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्य सरकार देखील विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. विज्ञानात करियर करू इच्छिणाऱ्यांना अनेक आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या क्षेत्रात योगदान दिल्यास अनेक पुरस्कारही दिले जातात. विद्यार्थ्यामध्ये रुची तयार करण्यासाठी अनेक राज्यस्तरीय विज्ञान संबंधित कार्यक्रमांचे आयोजनही करत असते. गोवा विज्ञान केंद्र व फ्रेंड्स फॉर अस्ट्रोनोमी हे देखील राज्यात आहे. या सर्व गोष्टींचा लाभ विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा. चांद्रयान मोहीम नंतर विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्रची आवड बऱ्यापैकी निर्माण झाली आहे. ही आवड कायम ठेवणे, ही आमची जबाबदारी आहे, असे मार्टिन यांनी यावेळी सांगितले.
भविष्यातील जग हे पूर्णपणे आधुनिक असणार आहे. आणि हे विज्ञानाशिवाय शक्य नाही. निदान प्राथमिक स्तरावरील विज्ञान सर्वांना येणे आवश्यक आहे. कोविड काळात केवळ विज्ञानामुळे आम्हाला लस मिळाली, भविष्यातही अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, हे लक्षात घेतले तर विज्ञान किती महत्वाचे आहे हे लक्षात येते. म्हणून सातत्याने या क्षेत्रात काम करणे आवश्यक आहे, असे मत उमेश कुमार रुस्तगी यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर विज्ञान फीएस्टा बुधवार २८ रोजी पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान विविध उपक्रम व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ रोजी समारोप व बक्षीस वितरण सोहळा होईल. यावेळी राज्य फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, गोवा पोलीस खात्याचे संचालक डॉ. एन. पी वाघमारे उपस्थित असणार आहेत.