राज्यात 'जी २० ' च्या २०'च्या बैठका झाल्या यशस्वी; आता पाकिस्तानचे पथक दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:29 AM2023-04-23T10:29:58+5:302023-04-23T10:30:22+5:30
पाकिस्तानचे शिष्टमंडळ या परिषदेच्या बैठकीसाठी मे महिन्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात 'जी २०' शिखर परिषदेच्या बैठका यशस्वीरीत्या पार पडल्या. या बैठकांमध्ये आरोग्य क्षेत्रावर विशेष चर्चा झाली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पाकिस्तानचे शिष्टमंडळ या परिषदेच्या बैठकीसाठी मे महिन्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी ही परिषदेसाठी नेमलेली समिती करीत आहे. गोवा सरकार त्यात केवळ जागा ठरवणे व अन्य तयारीत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'जी २०' शिखर परिषदेची पहिली बैठक १७ ते २० एप्रिलदरम्यान गोव्यात पार पडली. यानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, तसेच काही आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी गोव्याला भेट दिली होती. या बैठकीत आरोग्य क्षेत्रातील विविध बदल, तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रातील डिजिटल क्रांती यावर चर्चा झाली. पोलिओ समूळ नष्ट करणे, कोरोना आदी विषयांवरही चर्चा झाली. सदर बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकांसाठी आलेल्या प्रतिनिधींसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोवा हे शिक्षण, आरोग्यप्रमाणेच आता सांस्कृतिक पर्यटनाच्या दिशेनेही पावले टाकत आहे. गोव्यात जी-२० शिखर परिषदेच्या बैठका यशस्वीरीत्या पार पडल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
ई-रिक्षाला हिरवा झेंडा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते २४ रोजी सेवा, सुशासन, जनकल्याण'चा भाग म्हणून पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षाला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींचा प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य दिव्यांगजन आयोग व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवा सुरु करत आहे. व्हीलचेअर टॅक्सी सेवांमध्ये अग्रणी असलेल्या ईजी मूव द्वारे हे व्यवस्थापित केले जाईल.
अशी असेल रिक्षा
कामाच्या ठिकाणी, रुग्णालये, शाळा आणि इतर ठिकाणी प्रवास करताना व्हीलचेअर वापरणाऱ्यांांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी आयोग ही सेवा सुरु करत असल्याची माहिती राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली. या वाहनात दोन सदस्य दिव्यांग प्रवाशासोबत जाऊ शकतात. या रिक्षामध्ये चढताना रिक्षाचा मागचा दरवाजा रॅम्पमध्ये रूपांतरीत होतो. याशिवाय, सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिले असून व्हीलचेअरसाठी चारही बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"