गोव्याला जुगाराची मगरमिठी, नागरिकांमध्ये संताप; कॅसिनो माफियांचा थयथयाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:07 AM2022-12-01T09:07:23+5:302022-12-01T09:07:57+5:30
दादर, शिवाजी पार्क, माहिममध्ये ६४० बळी
नरेश डोंगरे / आशिष रॉय
पणजी (गोवा) : पैशासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवून तेरा वर्षांपूर्वी गोव्यात अवतरलेल्या कॅसिनो माफियांनी आता संपूर्ण राज्याला मगरमिठी मारली आहे. पणजीची शान असलेल्या मांडवी नदीवर कॅसिनो माफियांनी अक्षरश उच्छाद मांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहेच जनजीवनही पुरते बिघडून गेले आहे. या माफियांवर सरकारी यंत्रणांकडून कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
ब्रिटिशांनी व्यापाराच्या बहाण्याने चोरपावलांनी भारतात प्रवेश केला आणि नंतर संपूर्ण देशच गिळंकृत केला होता. त्याचाच कित्ता कॅसिनो माफियांनी गोव्यात गिरविला आहे. खानपान आणि मनोरंजनाच्या नावाखाली १३ वर्षांपूर्वी कॅसिनो गोव्यात आला. नंतर हळूच एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे सहा होत गेले. आजच्या घडीला गोवा-पणजीत एकूण २६ कॅसिनो सुरू आहेत. सहा कॅसिनो पणजीच्या मांडवी नदीच्या पात्रात आहेत. डेल्टिन जॅक, बिग डॅडी, मॅजेस्टिक प्राईड, कॅसिनो प्राइडसह अशा नावांनी सहा जहाजांमध्ये हे कॅसिनो थाटले आहेत. या कॅसिनो कम जहाजांवर अत्यंत आकर्षक आणि नेत्रदीपक अशी रोषणाई केली आहे.
भररस्त्यात ‘कॅसिनो जाना है क्या’
अंधार पडू लागताच ही रोषणाई भुरळ घालू लागते. कॅसिनो माफियांचे एजंट तुमच्यापर्यंत पोहचू लागतात. त्यांचे नेटवर्क गोव्याचे विमानतळ, बस-स्थानकापासून रस्त्या-रस्त्यात दिसून येते. रस्त्यावरच जागोजागी एजंट लोकांना ‘कॅसिनो जाना है क्या’, अशी विचारणा करतात. त्याच्या हातात जुगार खेळण्याचे मोफत कूपन ठेवतात. एन्ट्री फीमध्येच अनलिमिटेड दारू, जेवण आणि डान्सची मजा घेता येईल, असे पटवून दिले जाते व खेळ सुरू होतो.
एन्ट्री फीच्या नावावर मनमानी वसुली
मांडवीच्या किनाऱ्यावर फुटपाथलगत कॅसिनो चालकांनी पॉश कार्यालये थाटली आहेत. इथे कूपन दाखवून एन्ट्री फीची विचारणा करणाऱ्याकडून दोन हजारापासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत (मनात येईल त्याप्रमाणे) एंट्री फी घेतली जाते. त्यानंतर ग्राहकाच्या हातावर विशिष्ट बँड बांधले जातात. ते बँड पाहूनच बाउन्सर ग्राहकाला प्रवेश देतो. आत खाणे-पिणे आणि कूपनच्या माध्यमातून मोफत जुगार खेळवण्याचा डाव दिला जातो.
(पुढच्या भागात... अंतर्गत झगमगाट, तोकड्या कपड्यातील बाला अन् खिशाचा खुलतो ताला)