गोव्यामध्ये गणेशमूर्ती महागल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:59 PM2019-08-23T12:59:52+5:302019-08-23T13:04:03+5:30

गोव्यात चिकणमाती तसेच रंग महागल्याने चित्रशाळांमध्ये मूर्तीचे दर साधारणपणे मूर्तीमागे १00 ते २00 रुपयांनी वाढलेले आहेत.

Ganesh idols get expensive in Goa | गोव्यामध्ये गणेशमूर्ती महागल्या

गोव्यामध्ये गणेशमूर्ती महागल्या

googlenewsNext
ठळक मुद्देगोव्यात चिकणमाती तसेच रंग महागल्याने चित्रशाळांमध्ये मूर्तीचे दर साधारणपणे मूर्तीमागे १00 ते २00 रुपयांनी वाढलेले आहेत.मूर्तीकारांना हस्तकला महामंडळाकडून जे अनुदान दिले जाते ते वाढविले जावे आणि वेळेत ते दिले जावे, अशी मागणी आहे. मळा, पणजी येथील मुख्य दालनात तसेच वास्को येथे मिळून ६00 गणेशमूर्ती उपलब्ध केल्या आहेत. 

पणजी - गोव्यात चिकणमाती तसेच रंग महागल्याने चित्रशाळांमध्ये मूर्तीचे दर साधारणपणे मूर्तीमागे १00 ते २00 रुपयांनी वाढलेले आहेत. मूर्तीकारांना हस्तकला महामंडळाकडून जे अनुदान दिले जाते ते वाढविले जावे आणि वेळेत ते दिले जावे, अशी मागणी आहे. हस्तकला महामंडळाने यावर्षी मळा, पणजी येथील मुख्य दालनात तसेच वास्को येथे मिळून ६00 गणेशमूर्ती उपलब्ध केल्या आहेत. 

महामंडळाचे अधिकारी संतोष साळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महामंडळाने यंदा ६00 मूर्ती उपलब्ध केल्या असल्याचे सांगितले. मूर्तीकारांना प्रत्येक मूर्तीमागे १00 रुपये याप्रमाणे अधिकतम २५0 मूर्तींसाठी अनुदान दिले जाते. गेल्या वर्षी ४५0 मूर्तीकारांनी या अनुदानासाठी अर्ज केल्याचे ते म्हणाले. मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हे अनुदान दिले जाते. मळा, पणजी येथील मुख्य दालनात तसेच वास्को येथे टुरिस्ट हॉस्टेल इमारतीत मूर्ती उपलब्ध केलेल्या आहेत. 

रंग, चिकणमाती महागली 

डिचोलीचे मूर्तीकार अनिकेत चणेकर यांनी यंदा ३00 गणेशमूर्ती बनविल्या आहेत. ते म्हणाले की, ‘ यावर्षी रंग आणि चिकणमातीचे दर वाढलेले आहेत. कामगारांची दिवसाची मजुरी ३00 ते ५00 रुपये आहे. चिकणमाती नागझरहून आणतो.’ आपल्या चित्रशाळेत ६ कामगार असल्याची व आपल्याकडील मूर्तींचे दर ८00 रुपयांपासून २000 रुपयांपर्यंत असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकार जे मूर्तीमागे केवळ १00 रुपये अनुदान देते ते अगदीच अल्प आहे. मूर्तीमागे किमान २00 रुपये मिळायला हवेत, असे ते म्हणाले. १00 रुपये अनुदान पाच वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आले होते त्याचा फेरआढावा घ्यायला हवा. 

‘अनुदान वाढवून द्या’

पार्से येथील भानुदास गवंडी या मूर्तीकाराने म्हापशात ब्रागांझा इमारतीत चित्रशाळा उघडली आहे. त्यांनी यंदा १७0 गणेशमूर्ती बनविल्या आहेत. गवंडी म्हणाले की, ‘ रंगाचा दर ३ ते ४ टक्क्यांनी वाढला आहे. चिकणमातीचे दरही वाढलेले आहेत. सरकार १00 रुपये प्रती मूर्ती अनुदान देते त्यातील ५0 ते ६0 टक्के रक्कम अनुदान मिळविण्यासाठी सोपस्कारातच जातात. मूर्तीकारांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागते तसेच अन्य गोष्टीही कराव्या लागतात. त्यासाठी खर्च येतो. त्यामुळे हे अनुदान २00 रुपये तरी करायला हवे.’

गवंडी यांच्याकडे १८00 रुपयांपासून ५,000 रुपयांपर्यंत किमतीच्या मूर्ती आहेत. ते पुढे म्हणाले की,‘शाडूच्या मातीच्या मूर्तींसाठी सरकार अनुदान देते. प्रत्यक्षात मांद्रे, वारखंड भागात चिकणमाती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. चिकणमातीच्या एका ट्रकसाठी साधारणपणे सात ते साडेसात हजार रुपये मोजावे लागतात. दरम्यान, अनुदान वेळेवर मिळत नाही, अशी खंत काही मूर्तीकारांनी व्यक्त केली आहे. महामंडळाने याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. 

गवंडी म्हणाले की, गेल्या वर्षी १५७ मूर्तीसाठी मी अनुदानाकरिता अर्ज केला होता परंतु अजून अनुदान मिळालेले नाही. चतुर्थीनंतर आम्ही अर्ज सादर करतो त्यामुळे निदान एप्रिलपर्यंत तरी ते मिळायला हवे. तरच आम्ही पुढील मोसमासाठी गणेशमूर्ती बनविण्यासाठी ते वापरू शकतो.  

गोव्यात घराघरात सुमारे ६५ हजार गणेशमूर्तींचे पूजन केले जाते. ठिकठिकाणी मिळून २00 हून अधिक सार्वजनिक गणपती पुजले जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आहे तरीदेखील पेण, कोल्हापूर तसेच कर्नाटकमधील गोकाक येथून मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्तीही बाजारात विक्रीसाठी येतात.

 

Web Title: Ganesh idols get expensive in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा