गणेशोत्सव: विसर्जनस्थळी पुन्हा गणेशमूर्तीची आरती नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 10:15 AM2023-09-03T10:15:39+5:302023-09-03T10:18:45+5:30

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीला कोणत्याही परिस्थितीत एका जागेवरून हलवू नये. तसेच एकदा उत्तरपूजा झाली की त्या मूर्तीतले देवत्व जाते, त्यानंतर विसर्जनस्थळी नेऊन काही भाविक मूर्तीला आरती दाखवतात, असे करणे अयोग्यच.

ganeshotsav do not do aarti of ganesha idol again at visarjan | गणेशोत्सव: विसर्जनस्थळी पुन्हा गणेशमूर्तीची आरती नकोच!

गणेशोत्सव: विसर्जनस्थळी पुन्हा गणेशमूर्तीची आरती नकोच!

googlenewsNext

- डॉ. अरुण देसाई

हल्लीच श्री नागेश महारुद्र संस्थान, बांदिवडे यांनी दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते गुरुजी यांना पंचांग कार्यशाळेसाठी पाचारण केले होते. गुरुजी म्हणजे एक अत्यंत साधे सरळ, मनमिळावू आणि निगर्वी व्यक्तिमत्त्व वाटले. ही कार्यशाळा अत्यंत छान पार पडली. या स्तुत्य उपक्रमासाठी मंदिर संस्थानचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. भारतीय पंचांग, भारतीय गणित, भारतीय खगोलशास्त्र हे किती खोलवर आहे, याचे थोडेसे प्रात्यक्षिकच गुरुजींनी यावेळी दाखवले. 

पहिल्या दिवशी पंचांग आणि ज्योतिषशास्त्राबद्दल असलेली थोडीशी जिज्ञासा आणि कुतूहल म्हणून कित्येक नवीन व्यक्ती कार्यशाळेत सहभागी होताना दिसल्या. गुरुजींनी यावेळी बारा राशींवर लिहिले जाणारे राशिभविष्य यावर एक विनोद केला. त्यावेळी ही मंडळी अत्यंत दिलखुलास हसली, पण त दिवशी ज्यावेळी कार्यशाळेची समाप्ती झाली त्यावेळी पंचागाची अचूकता, कार्यप्रणाली इत्यादीविषयी प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आपले पूर्वज आपले गणित, खगोलशास्त्र किती महान होते व आहे हे जाणून या सर्व श्रोत्यांची छाती गर्वाने आणि अभिमानाने फुलून आली होती. रोजच्या धार्मिक निर्णयांचे शंका समाधान गुरुजींनी ओघवत्या शैलीत केले. या विषयावर एक अभ्यास त्यांनी कालसुसंगत' 'आचारधर्म' हा ग्रंथदेखील प्रसिद्ध केला आहे, त्याबद्दल माहिती दिली.

गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांचा जणू जिव्हाळ्याचा विषय. याविषयीसुद्धा गुरुजींना कित्येकांन प्रश्न विचारले. त्याची योग्य समर्पक उत्तरे त्यांनी दिली. गणेश चतुर्थीचे पूजन एखाद्या आलेले असेल तर अचानक बंद केले तर चालते का? यावर उत्तर देताना गुरुजी म्हणाले, की गणेश चतुर्थी हा कुलाचार नसून ते देवकार्य आहे. त्यामुळे ते कधीही सुरू केले आणि कधीही बंद केले तरी चालते. 

काही कारणाने भाद्रपद शु. चतुर्थीला गणेश पूजन करता न आल्यास ते एका महिन्यानंतर केले तर चालते का? या प्रश्नाला उत्तर देताना गुरुजी म्हणाले की, गणेश चतुर्थी ही भाद्रपद शु. चतुर्थी या दिवशी करायची असते. ती नंतर पुढे ढकलून अन्य वेळी करण्यास कोणताही शास्त्राधार नाही. अशी काही अडचण आल्यास पूजा सरळ दुसऱ्या वर्षी करावी. 

मूळच्या संकल्पनेनुसार गणेशाची पूजा ही सकाळी स्थानिक मातीपासून मूर्ती बनवून तिला पिंजर गंधाने नाक डोळे तयार करून दिवसभर त्या मूर्तीची पूजा करून संध्याकाळी तिचे विसर्जन करायचे असते. पण कधी कधी गौरी आणि गणपती पूजन एकाच दिवशी आल्यामुळे गणेश पूजनाचा प्रसाद स्त्रियांचा उपवास असल्यामुळे त्यांना ग्रहण करता येत नाही, त्यामुळे सोय म्हणून गणपती दीड दिवसांचे करण्यात आले. आणि त्याचे स्वरूप थोडे मोठे होऊन हळूहळू पाच, सात, नऊ दिवस झाले. 

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीला कोणत्याही परिस्थितीत एका जागेवरून हलवू नये असे त्यांनी सांगितले. तसेच एकदा उत्तरपूजा झाली की त्या मूर्तीतले देवत्व जाते, त्यानंतर विसर्जनस्थळी नेऊन काही भाविक मूर्तीला आरती दाखवतात, असे करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. सोयरसुतका वेळी घरातली पंचायतन पूजा शक्यतो ते दहा दिवस बंद ठेवू नये, तर दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी. तीन दिवसांहून अधिक काळ पूजा न झाल्यास मूर्तीतील देवत्व कमी होते, असेही ते म्हणाले.

बाळाच्या जन्मानंतर मुलगा झाल्यास पेढे आणि मुलगी झाल्यावर बर्फी वाटणे इथून खऱ्या अंधश्रद्धेला सुरुवात होते, असे बोलणे कुठेतरी भाषणातून गुरुजींच्या कानावर पडले. त्यावर भाष्य करताना गुरुजी म्हणाले, की असे करणे ही अंधश्रद्धा नसून बर्फी वाटणे वगैरे हा एक संकेत आहे. मुलगी पुढे बारावी पास झाल्यानंतर आपण पेढेच बर्फी नाही आणि मुलाच्या लग्नाचे लाडू कधी असे विचारतो तर मुलीच्या लग्नाची बर्फी कधी असे विचारत नाही, तर तर तिथेपण विचारतो, अशी त्यांनी कोटी केली. 

अजून एक किस्सा सांगताना गुरुजी म्हणाले, की कुणीतरी त्यांना म्हणे विचारले की टीव्हीवर हल्ली रुद्राक्ष, माळा इत्यादी साहित्याची फार जाहिरात होते. तुमची ज्योतिषांची सध्या सगळीकडे चलती आहे. यावर गुरुजींनी मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले की, अशा जाहिराती हजार लोकांनी पाहिल्या त्यातल्या ५० लोकांनी त्यातले रुद्राक्ष, हर माळा इत्यादी विकत घेतले आणि पाच लोकांना त्यातून काहीतरी फायदा पण झाला असेल. पण त्याच टीव्हीवर साबणाच्या जाहिरातीत चाळीस वर्षांची स्त्री साबण वापरून वीस वर्षांची बनते, असे धादांत खोटे सांगितले जाते; अशा जाहिरातीवर तुमचा आक्षेप का नाही? असा प्रतिसवाल त्यांनी केला. सरकारी सुट्टया जाहीर करताना सुद्धा दाते पंचांगाचा उपयोग होतो, अशीही माहिती यावेळी मिळाली. 

इतर मंदिर संस्थानांनी सुद्धा या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन भारतीय संस्कृती, धर्म, खगोलशास्त्र इ. विषयी जनजागृती कार्यक्रम मुद्दाम घडवून आणावेत. तसेच याबाबतचे वेगवेगळे साहित्य, ग्रंथ संस्थानांतर्फे लोकांसाठी उपलब्ध करून द्यावे. असाही सूर येथे उमटला.

 

Web Title: ganeshotsav do not do aarti of ganesha idol again at visarjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.