महाराष्ट्रातील 12 जणांची गँग गोव्यात जेरबंद; 41 मोबाईल, ड्रग्सही जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:37 PM2022-12-29T17:37:51+5:302022-12-29T17:39:54+5:30
या टोळीला बागा कळंगूट परिसरातील एका हॉटेलमधून जेरबंद करण्यात आले असून ते गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून होते.
वासुदेव पागी -
पणजी - सनबर्न पार्टीसाठी आलेली 12 गुन्हेगारांची टोळी कळंगूट पोलिसांकडून पकडण्यात आली. त्यांच्याकडून 41 महागडे मोबाईल आणि एमडीएमए हा घातक अंमली पदार्थ सापडला. गँगचे मनसुबे नेमके काय होते याची माहिती घेण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत. ही अंतरराज्य टोळी महाराष्ट्रातील असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
या टोळीला बागा कळंगूट परिसरातील एका हॉटेलमधून जेरबंद करण्यात आले असून ते गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून होते. त्यांच्याकडे जप्त केलेल्या महागड्या मोबाईलवरून ते पट्टीचे मोबाईल चोरटे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी केला आहे. परंतु त्यांच्याकडे 8 ग्रँम एमडीएमए अंमली पदार्थ सापडला आहे. एकूण मोबाईल 30 लाख रुपये किंमतीचे आहेत तर जप्त करण्यात आलेला ड्रग्स हा 24 हजार रुपये किंमतीचा आहे. एकूण 324000 रुपये किंमतीचा माल त्यांच्याकडे जप्त करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत पर्वरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेष कर्पेही उपस्थित होते.
सनबर्नची तिकीटे घेतली होती -
सनबर्न ईडीएम आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून गोव्यात आयोजित केलेल्या इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या लोकांचे मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी ही टोळी महाराष्ट्रातून गोव्यात आली होती इतक्याच तर्कावर तपास चालणार नाही. कारण ही टोळी प्रत्यक्ष सनबर्न पार्टीत प्रवेश मिळविणार होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाीन पद्धतीने पार्टीची तिकीटेही विकत घेतली होती अशी माहिती वालसान यांनी दिली. पार्टीत जाऊन कोणते गुन्हे करण्याचा त्यांचा इरादा होता हे तपासानंतरच सांगणे शक्य होईल असेही वालसान म्हणाले. पार्टीत शिरण्यापूर्वीच त्यांना पकडण्यात आल्यामुळे मोठाअनर्थ टळला आहे.
एसयुव्हीने फिरणारे, पार्टीत प्रवेश मिळविणारे
पकडली गेलेले 12 जणांचे गँग ही हलकेपणे घेण्यासारखा प्रकार नाही. कारण ते मोबाईल चोरटे असले तरी आयफोनसारखे महागडे मोबाईल चोरणारी ही गँग आहे. सनबर्न सारख्या महागड्या पार्टीची तिकीटे मिळविलेली ही गँग आहे. सर्वात महत्तवाचे म्हणजे हे चोरटे बसने किंवा साध्या वाहनाने आलेले नाहीत तर एसयुव्ही सारखी अलिशान कार घेऊन आले आहेत. त्यामुळे अत्यंत गंभीरपणे हे प्रकरण हाताळले जाणार असल्याचे अधीक्षक वालसान यांनी सांगितले. त्यांची एसयुव्ही गाडी पोलीसांनी जप्त केली आहे.