कचरा ट्रक उलटला, १ ठार ५ जखमी
By काशिराम म्हांबरे | Published: April 24, 2024 03:09 PM2024-04-24T15:09:14+5:302024-04-24T15:09:24+5:30
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
म्हापसा : राष्ट्रीय महामार्गावरून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कचरावाहू ट्रक गिरी येथे उड्डाण पूलाचे रेलिंग तोडून तेथील सर्विस रोडवर कासळला. आज बुधवारी पहाटे ५ च्या दरम्यान घडलेल्या या भिषण अपघातात ट्रकातील एक व्यक्ती ठार झाला आहे तर पाच व्यक्ती जखमी झाले आहेत. यातील चालकासहित दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्यानंतर रस्त्यावरील दुभाजक ओलांडून ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गेला व तेथून किमान १० मिटरवरून खाली कोसळून उलटला. ट्रक खाली पडल्यानंतर त्यात असलेला कामगार ट्रक खाली चिरडला गेल्याने मरण पावला. सदर ट्रक हा कांदोळी पंचायतीचा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यातील सर्वजण झारखंड येथील असल्याचे सांगण्यात आले. महामार्गाला लागून असलेल्या सर्विस रोडवर अपघाग्रस्त ट्रक कोसळला. त्यावेळी तेथे दुसरे वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ट्रकची अपघातात बरीच नुकसानी झाली आहे.
अग्नी शमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नंतर सर्वांना ट्रकातून बाहेर काढले. घटनेनंतर पंचनामा करण्यासाठी पोलीस घटना स्थळी दाखल झाले. अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरु करण्यात आला आहे. क्रेनच्या मदतीनेनंतर तो ट्रक तेथून हटवण्यात आला. ट्रकातील कामगारांची तसेच चालकाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.