डेन्टिगच्या कामावेळी गॅस गळती; गॅरेज पेटले, दोन लाखांची हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 02:02 PM2023-09-24T14:02:30+5:302023-09-24T14:03:35+5:30
मडगाव येथील घटनेने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : येथील एका गॅरेजला आग लागून अंदाजे दोन लाखांची मालमत्ता जळून खाक झाली. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. गेराल्डो क्लॅमेंट यांच्या मालकीचे हे गॅरेज असून, कारचे डेन्टिंगचे काम चालू असताना गॅसला गळती लागल्याने ही आग लागली असल्याची माहिती मडगाव अग्निशमन दलाने दिली आहे.
दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी आग विझविल्याने सहा लाखांची मालमत्ता बचावली. पेडे- मडगाव येथील लुसियानो इमारतीत तळमजल्यावर दुकान क्रमांक १ मध्ये हे गॅरेज आहे. तेथे कारच्या डेन्टिंगचे काम चालू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. आगीत गॅरेजमधील अनेक साहित्य जळून खाक झाले आहे. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात दलाच्या जवानांना यश आले. एका बंबचा वापर करण्यात आला.
कारने घेतला पेट
बागभाट राय येथे एका कारला आग लागण्याची घटना घडली. चाल्सी फर्नाडिस यांच्या मालकीची ही कार आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. दहा हजार रुपयांचे या घटनेत नुकसान झाले. तर मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने १५ हजारांची मालमत्ता बचावली.