'तिळारी'चे गेट लॉक; उघडण्याचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:44 AM2023-12-27T10:44:10+5:302023-12-27T10:44:18+5:30
खुला होताच प्रथम पर्वरीच्या प्रकल्पाला पाणी सोडणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लॉक झालेली तिळारी धरणाची दोन्ही गेट्स उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न काल, मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. ही गेट्स खुली झाल्यानंतर आधी थेट पर्वरीच्या १० एमएलडी प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जाणार आहे.
जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी स्वतः कामावर देखरेख ठेवून आहे. धरणातील पाण्याचे दोन हजार टन वजनाचे प्रेशर या दोन्ही गेटवर आहे. ही गेट खुली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. पर्वरी येथील पाणी प्रकल्प बंद असल्याने तिळारीचे पाणी सुरू झाल्यावर सर्वप्रथम थेट या प्रकल्पाला आम्ही पाणी पुरवठा करणार आहोत. पाणी सोडल्यानंतर साधारणपणे दीड दिवसांनी ते पर्वरीला पोहोचेल व हा प्रकल्प कार्यान्वित होईल. गेट खुली करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते, असेही बदामी म्हणाले.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार ही गेट्स वापरात नसली की लॉक होण्याचे प्रकार याआधीही घडलेले आहेत. परंतु, ती खुली करणे मोठे कष्टप्रद काम आहे. त्यासाठी पुणे येथून तज्ज्ञ बोलविण्यात आले आहेत. तिळारीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला सध्या आमठाणे धरणातून तसेच साळ येथील शापोरा नदीतून पंम्पिंग करून पाणी घेतले जाते. १३० एमएलडी पाणी रोज या दोन स्रोतांमधून या प्रकल्पाला मिळत आहे. परंतु, पर्वरी पाणी प्रकल्प मात्र कोरडा आहे.
बेभरवशाचे धरण
तिळारीचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे बनले आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देखभाल, दुरुस्तीसाठी कालवे बंद असतातच, शिवाय अधूनमधून कालवे फुटतात. कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने कालव्यांतून पाणी सोडणे बंद आहे.
घशाबरोबर शेतीही सुकली...
पर्वरीचा दहा एमएलडी प्रकल्प पर्वरी पठारासह साळगाव, कांदोळी, कळंगुट, गिरी व हणजूण आदी भागांना पाणी पुरवठा करतो. हा प्रकल्प बंद असल्याने या भागातील लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत, शिवाय तिळारी कालव्याच्या पाण्यावर पेडणे, डिचोली तालुक्यांतील शेती अवलंबून आहे. पाणी वेळेत मिळाले नाही तर शेती सुकून जाण्याच्या घटनादेखील या अगोदर घडल्याचे सांगण्यात येते.