गौरव बिद्रेचा सुटण्याचा खटाटोप पुन्हा फसला, गौरी आचार्य खून प्रकरणात जामीन फेटाळला
By वासुदेव.पागी | Published: November 6, 2023 04:26 PM2023-11-06T16:26:25+5:302023-11-06T16:29:48+5:30
गौरव बिद्रेने एकतर्फी प्रेमातून प्रा. गौरी आचार्य हिचा गळा आवळून खून केला होता. या खून प्रकरणी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा गौरव प्रकाश बिद्रेला गोव्यात अटक करण्यात आली होती.
पणजी : प्राध्यापिका गौरी आचार्य हिच्या खून प्रकरणात जीम ट्रेनर गौरव बिद्रेला पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. गौरवचे असलेले इतर युवतींशी संबंध आणि तो गोव्यातून पळून जाण्याची असलेली शक्यता लक्षात घेऊन त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
गौरव बिद्रेने एकतर्फी प्रेमातून प्रा. गौरी आचार्य हिचा गळा आवळून खून केला होता. या खून प्रकरणी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा गौरव प्रकाश बिद्रेला गोव्यात अटक करण्यात आली होती. आरोपी गौरवने आपणच गौरीचा गळा आवळून खून केल्याची कबुलीही दिली होती आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून जुने गोवा पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे.
आरोपपत्र दाखल केल्यानंतर गौरव जामीनवर सुटण्यासाठी सातत्याने आटापीटा करीत आहे. सत्र न्यायायापासून उच्च न्यायालयापर्यंत यापूर्वीही त्याने धाव घेतली होती. परंतु त्याच्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन तसेच त्याला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. शिवाय पोलिसांनी सादर केलेले कागदोपत्री पुरावेही गौरवच्या विरोधात गेले आहेत. गौरवचे अनेक युवतींशी संबंध असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. खंडपीठाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याचा आणखी एक प्रयत्न फसला आहे.
गौरव हा ओल्ड गोवा येथे एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता. त्या दरम्यान खांडोळा कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापिका गौरी बरोबर त्याची ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले होते. मात्र गौरी त्याच्यापासून दूर राहणे पसंत करू लागल्यामुळे त्याने तिचा काटा काढला असा आतापर्यंतच्या तपासाचा निष्ष्कर्श आहे.