वीजही महागल्याने गोवेकरांत संताप
By admin | Published: April 17, 2015 02:01 AM2015-04-17T02:01:39+5:302015-04-17T02:02:00+5:30
पणजी : वीज भाड्यात १ एप्रिलपासून १४ टक्के वाढ लागू झाली असून यामुळे आम आदमीच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे.
पणजी : वीज भाड्यात १ एप्रिलपासून १४ टक्के वाढ लागू झाली असून यामुळे आम आदमीच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे. पाणीपट्टीत दुपटीने केलेल्या वाढीपाठोपाठ आता वीजही महागल्याने ही भाडेवाढ कंबरडे मोडणारी ठरली असून लोक सरकारच्या नावाने बोटे मोडत आहेत.
सरकार या ना त्या प्रकारे जनतेच्या खिशातून पैसा बाहेर काढू पाहात आहे. संयुक्त वीज नियमन आयोगाकडे वीज खात्याने १९ टक्के वाढ मागितली होती; परंतु ती १४ टक्के देण्यात आली. आयोगाच्या शिफारशीवर सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली, तेव्हा लोकांनी भाडेवाढीस जोरदार विरोध केला.
सध्या पहिल्या ६० युनिटकरिता प्रती युनिट १.२० रुपये आकारले जातात. ६१ ते २५० युनिटकरिता १.७० रुपये आकारण्यात येतात. २५१ ते ५०० युनिटपर्यंत २.७५ रुपये, तर ५०० पेक्षा जास्त युनिट झाल्यास ३.२० रुपये आकारले जातात.
नव्या दरानुसार आता १०० युनिटपर्यंत १.३० रुपये, १०१ ते २०० युनिटपर्यंत १.९० रुपये, २०१ ते ४०० युनिटपर्यंत ३.१० रुपये, तर ४०० पेक्षा जास्त युनिट झाल्यास ३.६० रुपये आकारले जातील.
गेल्या महिन्यात जनसुनावणीत वितरणातील वीज गळतीचा प्रश्नही उपस्थित झाला होता. २०१३ साली वीज गळती १२.७५ टक्के होती, त्यात वाढ होऊन आता १५.५ टक्के झालेली आहे. घरांमध्ये तसेच रस्त्यांवर वीज बचत करणाऱ्या दिव्यांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबवले जातील. (प्रतिनिधी)