GCA घोटाळा - बीसीसीआय गोवा पोलिसांना देणार १० वर्षांतील माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 08:05 PM2016-06-25T20:05:07+5:302016-06-25T20:05:07+5:30
गोवा क्रिकेट असोसिएशन घोटाळा प्रकरणातील तपासकामात पोलिसांना आवश्यक असलेली सर्व माहिती देण्याचे आश्वासन बीसीसीआयने गोवा पोलिसांना दिले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
पणजी, दि. 25 - गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) घोटाळा प्रकरणातील तपासकामात पोलिसांना आवश्यक असलेली सर्व माहिती देण्याचे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गोवा पोलिसांना दिले आहे. परंतु १० वर्षांची माहिती सुपूर्द करण्यासाठी काहीसा वेळ लागणार असल्यामुळे त्यासाठी मंडळाने मूदत मागितली आहे.
जीसीएला अनुदानस्वरूप देण्यात आलेल्या १० वर्षांच्या काळाची सविस्तर माहिती देण्याची तयारी बीसीसीआयने गोवा पोलिसांच्या गुन्हा आर्थिक विभागाच्या पोलिसांना दिली आहे. एवढी विस्तृत माहिती देण्यासाठी काहीसा वेळ लागणार असल्यामुळे मुदत मागितली आहे. दरम्यान तपास कामासाठी गोव्याहून मुंबईला गेलेले आर्थिक गुन्हा विभागाचे पथक आपली मोहीम जवळ जवळ फत्ते करून गोव्यात आले. मागितलेली माहिती बीसीसीआयकडून पोलिसांना ईमेलद्वारेही पाठविली जाणे शक्य आहे. परंतु बीसीसीआयचे सचीव अजय शिर्के यांची या प्रकरणात जबानीही नोंदविली जाणार आहे. त्यामुळे पोलीस पथकाला एक तर पुन्हा मुंबईला जावे लागणार किंवा शिर्के यांना त्यासाठी गोव्यात बोलाविण्यात येणार आहे.
मुंबईला गेलेल्या पोलिसांच्या तुकडीने एकंदरीत अफरातफरीची सविस्तर माहिती बीसीसीआयला दिली. बीसीसीआयने पाठविलेल्या पैशांचा गैरवापर भविष्यात होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची सूचनाही बीसीसीआयला करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान अफरातफर प्रकरणासाठी अटक करण्यात आलेले प्रमुख संशयित जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचीव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांची शुक्रवारी जामीनवर सुटका करण्यात आल्यानंतर न्यायालयाच्या अटींनुसार तिघेही संशयित शनिवारी सकाळी ९.३० वाजता आर्थिक गुन्हा विभागात हजर राहिले. त्यांना अधुन मधुन आत बोलावून प्रश्न करण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू ठेवला होता. संध्याकाळी ५.३० वाजता ते तेथून निघाले.