यशाच्या आत्मविश्वासापुढे लिंगभेद गौण - मेघना गुलजार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 09:51 PM2018-11-26T21:51:47+5:302018-11-26T21:52:11+5:30
यश नक्की मिळणार हाच आत्मविश्वास प्रत्येक कलाकाराला मिळतो, त्याच्यासोबत काम करणे हे त्याचे ध्येय असते, त्यापुढे लिंगभेदाचा मुद्दा गौण ठरतो, असे मत चित्रपट निर्माती, दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
- संदीप आडनाईक
पणजी - यश नक्की मिळणार हाच आत्मविश्वास प्रत्येक कलाकाराला मिळतो, त्याच्यासोबत काम करणे हे त्याचे ध्येय असते, त्यापुढे लिंगभेदाचा मुद्दा गौण ठरतो, असे मत चित्रपट निर्माती, दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
भारतीय सिनेमातील महिला दिग्दर्शक या विषयावर ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मेघना गुलजार, लीना यादव आणि गौरी शिंदे यांची शशांक खेतान यांनी मुलाखत घेतली. यावेळी तीन्ही महिला दिग्दर्शकांनी महिला दिग्दर्शकांनी मांडलेल्या कथाविषयांवर भाष्य केले.
एकदा तुम्हाला यश मिळाले, की तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाते. तुमचा कलाकार मग लिंगभेद पहात नाही, तो तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतो, तो तुमच्या मताचा आदर करतो आणि यश चाखतो,असे मत मेघना गुलजार यांनी व्यक्त केले. पहिल्या सिनेमाला अपयश मिळाले असले तरी त्याचा विषय तुमच्याबद्दल सर्वकाही सांगून जाते. फिलहालबाबतीतही काळाच्या पुढचा विषय मांडला. आज तंत्रज्ञानामुळे बापाविना मूल जन्माला घालणे सहज शक्य झाले आहे. पण अनेक महिलांना ते हवे आहे, हे लक्षात आल्यामुळेच तो विषय निवडल्याचे त्या म्हणाल्या. वडिलांचे आडनाव हे माझ्या अभिव्यक्तीसाठी सुरुवातीला अडसर बनले होते, असेही त्या म्हणाल्या. केवळ पुरुष आणि महिला दिग्दर्शक असे न पाहता त्यातील कथाविषय पहा, असे सुनावत त्यांनी बिमल राय यांच्यापासून संजय लीला भन्साळीपर्यंत अनेक दिग्दर्शक पुरुष असल्याचे मत त्यांनी मांंडले.
पार्च्ड, तीन पत्तीसारखे सिनेमे करणाºया लीना यादव यांनीही लिंगभेदाचा मुद्दा गौण असल्याचेच मत मांडले. तुम्ही महिला आहे, म्हणून तुमच्याकडे कोणी सिनेमे करत नाहीत. माझ्या सिनेमातील लैंगिकता ही परिस्थितीतून निर्माण झालेल्या हिंसेतून आली आहे. ते लैगिंकतेबद्दल बोलत नाहीत. यातून अगदी मुलभूत गरजा मांडल्या आहेत. भारताबाहेर पार्च्ड सिनेमाने मिळविलेल्या यशामुळेच तो सेन्सॉर झाला नाही, असेही त्या म्हणाल्या.
इंग्लिश विंग्लिश, डिअर जिंदगीसारख्या चित्रपटामुळे प्रसिध्द झालेल्या गौरी शिंंदे यांनीही लिंगभेदाचा मुद्दा फेटाळून लावला. माझ्या सिनेमातून काही न संपणाºया प्रेमकथा मी मांडल्या आहेत. श्रीदेवीसोबत काम करताना त्यांच्यातील साधेपणा माझ्या सिनेमातील कथाविषयाला न्याय देईल, असे वाटले. सामान्य परिवारातील महिलेच्या भोवती फिरणारा हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांबरोबर सर्वच क्षेत्रातील लोकांना भावला.