गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सढळ हस्ते मदत; निर्मला सीतारामन यांची CM प्रमोद सावंतांना ग्वाही
By किशोर कुबल | Published: August 25, 2023 01:51 PM2023-08-25T13:51:10+5:302023-08-25T13:54:22+5:30
कॅसिनोंमधील बेटिंगवर २८ टक्के करावर फेरविचाराची मुख्यमंत्र्यांची मागणी.
किशोर कुबल, पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन राज्यातील विकासकामांबाबत सखोल चर्चा केली. राज्यात होणार असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सढळ हस्ते मदत करण्याचे आश्वासन सीतारामन यांनी दिले. कॅसिनोंमधील बेटिंगवर २८ टक्के कर लागू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री गुरुवारी रात्री दिल्लीत दाखल झाले असून केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री तसेच इतर केंद्रीय मंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट ते घेणार आहेत. गोव्यात होणार असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. आवश्यक पायाभूत सुविधा निर्धारित कालावधीत तयार केल्या जातील. सर्व स्टेडियम्सच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्घाटन समारंभ येत्या २५ ऑक्टोबर रोजी नियोजित आहे, तर समारोप समारंभ ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, ऑनलाइन गेमिंगमधील बेट्सच्या पूर्ण दर्शनी मूल्यावर २८ टक्के कर लावण्याचा जीएसटी कौन्सिलचा निर्णय गोव्यातील कॅसिनो उद्योगांच्या मुळावर आलेला आहे. कॅसिनो बंद पडल्यास सरकारला वार्षीक ५०० कोटी रुपयांहून अधिक महसुलास मुकावे लागेल ही चिंता राज्य सरकारला आहे.
जीएसटी कौन्सिलमध्ये राज्याचे प्रतिनिधी असलेले गोव्याचे उद्योगमंत्री मॅावीन गुदिन्हो यानी या मागणीवर केंद्राने फेरविचार करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी सीतारामन यांचे याकडे लक्ष वेधले. २८ टक्के कराचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली.