स्वतः सह समाजाचा विकास करणारे शिक्षण घ्या; इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 12:14 PM2024-07-30T12:14:46+5:302024-07-30T12:15:42+5:30

गोवा विद्यापीठाचा पदवीदान सोहळा

get an education that develop yourself and your community isro chief s somanath appeal to students | स्वतः सह समाजाचा विकास करणारे शिक्षण घ्या; इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन 

स्वतः सह समाजाचा विकास करणारे शिक्षण घ्या; इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजीःगोवाविद्यापीठाने चांगले नागरिकही तयार केलेत, पण एवढ्यावर न थांबता, विद्यार्थ्यांना समाजातील विविध पैलूंशी सहज जोडू शकेल, असे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. राज्यात हे एकच विद्यापीठ असल्याने त्यांना असे करणे सोपे आहे. विद्यार्थ्यांनीही अशा शिक्षणावर भर द्यावा, ज्यातून आपल्यासोबत समाजाचाही विकास होऊ शकेल, असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी केले.

गोवा विद्यापीठाचा ३५वा पदवीदान सोहळा सोमवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ बोलत होते. त्यांच्यासोबत सन्मानीय पाहुणे म्हणून राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाचे कुलपती पी.एस. श्रीधरन पिल्लई, कुलगुरू प्रा. हरीलाल मेनन, कुलसचिव (रजिस्ट्रार) व्ही.एस. नाडकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे आहे, नाव कमावयचे आहे, तर केवळ एक-दोन गुण आत्मसात करून ते शक्य होणार नाही, यासाठी नेहमीच नवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला पाहिजे. जरी एखादा विषय आवडला नाही, तरी त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण करणे आवश्यक आहे. यातूनच आपण वेगळा विचार करू शकतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण अष्टपैलू होत जातो. त्यासाठी जिद्द आणि मेहनत करणे आवश्यक असते. नव्या लहान-मोठ्या जबाबदाऱ्या घेणे आवश्यक आहे, असे डॉ. सोमनाथ यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

इस्रो प्रमुखांना डॉक्टरेट बहाल

डस्रो प्रमुख डॉ.एस. सोमनाथ त्यांच्या विज्ञान आणि अंतराळ या क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्याची दखल घेत, त्यांना गोवा विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यांना कुलपती आणि कुलगुरू यांच्या हस्ते विशेष स्मृतिचिन्हही भेट देण्यात आले.

'नवे अभ्यासक्रम सुरू'

गोवा विद्यापीठाने नावीन्यपूर्ण ध्येय ठेवून आतापर्यंत वाटचाल केली आहे. ही वाटचाल भविष्यातही ध्येय मिळेपर्यंत अशीच कायम राहणार आहे. यापूर्वी अनेक महत्त्वाच्या गोष्टी विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने केल्या आहेत. भविष्याचा विचार करून आणखी नव्या आधुनिक साधनसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यापीठात नवे अभ्यासक्रमही सुरू करणार आहोत, अशी माहिती गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरीलाल मेनन यांनी दिली.

पृथ्वी आणि विज्ञान विभागातर्फे गोवा विद्यापीठाला सुमारे १० कोटी रुपये देण्यात येणार आहे. या निधीतून आम्ही नव्या आवश्यक साधनसुविधा उभारणार आहोत. यंदा आम्ही पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) योजनेसाठी पात्र ठरलो आहोत. या अंतर्गत मल्टी एज्युकेशनल अॅण्ड रिसर्च युनिव्हर्सिटीज (मेरू) उपयोजनेच्या साहाय्याने आम्ही नवीन अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. ज्यामध्ये बीई इन बायोइंजिनिअरिंग आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स, इंटिग्रेटेड एमएससी इन इकॉनॉमिक्स, इंटिग्रेटेड एमबीए, इंटिग्रेटेड एमएससी इन फिजिक्स आणि बायोलॉजी, बी. पी. एड आणि एम.पी. एड प्रोग्राम्स, संस्कृत आणि आयुर्वेदिक या विषयांचा समावेश आहे,
असे मेनन यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठाकडे चांगले उच्चशिक्षित आणि अनुभवी शिक्षक आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी लाभ करून घ्यावा. आपल्या यशस्वी आयुष्यात पालक आणि चांगल्या शिक्षकांचा मोठा हातभार असतो. या गोष्ठी आता कळत नाहीत, पण भविष्यात जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि मागे वळून पाहाल, तेव्हा या गोष्टींचे मोल कळेल, असेही डॉ. सोमनाथ म्हणाले.

गोवा विद्यापीठाचा सविस्तर प्रकल्प अहवाल वेळेआधीच सादर करण्यात आला आहे. त्यात नवीन पायाभूत सुविधांवर अनुदान खर्च कसा करण्यात आला, याबाबतही माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने स्कूल ऑफ अर्थ, ओशन अॅण्ड अॅटमॉस्फेरिक सायन्सेस, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस (बायो- केमिस्ट्री इमारत), केमिकल सायन्सेस (फॅकल्टी रिसर्च लॅब्स, एफआरएल), फुटसल कोर्ट आणि तीन वसतिगृहे (मुली, मुले आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी), मनोहर पर्रीकर स्कूलच्या सभागृहाचे नूतनीकरण, आयसीपी एमएस, हायपर- स्पेक्ट्रल कॅमेरा, अॅटोमिक फोर्स मायक्रोस्कोप (एएफएम), फ्लोरेसेन्स ऍक्टिव्हेटेड सेल सॉर्टर यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे, अशी माहिती मेनन यांनी दिली.

 

Web Title: get an education that develop yourself and your community isro chief s somanath appeal to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.